भाजपा का बाबा बंगाली! राष्ट्रवादीने भाजप, मोदींना डिवचले!

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येताच सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. भाजपच्या या घोषणेवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट बाबा बंगाली ठरवले आहे. राष्ट्रवादीने नाव न घेता मोदींवर निशाणा साधला आहे.
बंगाल भाजपने एक ट्विट करून सत्तेत येताच पश्चिम बंगालमधील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. इंग्रजीत हे ट्विट करतानाच मोदींचा फोटोही ट्विट केला आहे. त्यावर बंगालीतून कोरोनाची लस मोफत देण्याविषयी म्हटलं आहे. भाजपच्या या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘भाजपा का बाबा बंगाली! चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, किया कराया? तुरन्त काट! पोलिटिकल दुश्मन से छुटकारा, इलेक्शन में धोखा, गठबंधन में चोट-निसंकोच संपर्क करें, पार्टी में अनबन? किसानों की कर्जामुक्ती, आंदोलन यात्रा में रुकावट, जटिल समस्याका थाली बजाके इलाज, गोल्ड मेडालिस्ट (वाराणसी)’, असं ट्विट करत राष्ट्रवादीने मोदी तसेच भाजपची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीच्या या खोचक ट्विटमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांच्या निवडणुकांसाठी मतदान झालं आहे. अवघ्या दोन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. उर्वरीत दोन टप्प्यांसाठी २६ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच २ मे रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. त्यामुळे या दोन टप्प्यात जास्तीत जास्त सीट पदरात पाडून घेण्यासाठी थेट भाजपने सर्वांनाच मोफत कोरोनाची लस देण्याचं जाहीर केलं आहे. भाजपच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सत्तेत आल्यावर सर्वांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एका रॅलीत ही घोषणा केली होती. आमचं सरकार ५ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोरोनाची लस टोचणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.




