
मुंबई : आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आता ही आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा १५-१६ किंवा २२-२३ ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नुकतीच रद्द झालेली परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आली. या मागे काही उमेदवाराचं हित हाच मुद्दा असल्याचं टोपे यांनी सांगितलं असलं तरी ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही याबद्दलची साशंकता होती.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पंजाब सरकारने न्यासा या कंपनीला तेथील गैरकारभार प्रकरणी तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केले. पुढे उच्च न्यायालयातून ही कंपनी ब्लॅकलिस्ट मधून बाहेर पडली. २०१७ ला महाराष्ट्रातील एफवायजेसी म्हणजे अकरावी एडमिशन लिस्टचे काम न्यासा आशिया या कंपनीला दिले गेले, त्यातील पोर्टल मध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येऊन काही काळासाठी या कंपनीचे पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने या कंपनीवर काहीही कार्यवाही/दंड केला नाही.
फडणवीस सरकारने केली होती निवड
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांच्या अधिपत्याखालील आयटी विभागाने फडणवीस सरकारच्या काळातच या परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची निवड केलेली आहे. न्यासा कंपनी आरोग्य विभागाने निवडलेली नसून परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणे इतकीच जबाबदारी आरोग्य विभागाची होती, असे टोपे यांनी स्पष्ट केले.




