आरोग्य

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण; मिनी लॉकडाऊनची शक्यता

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव आता अधिक वेगानं होताना दिसत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात आज २० हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ हजार ४९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज २० ङजार ९७१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ हजार ४९० रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या ९१ हजार ७३१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ टक्क्यांवर आहे.

पेडणेकर यांनी काल ट्विटरद्वारे मुंबईतील आठवडाभराची कोरोना आकडेवारी दिली होती. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कशाप्रकारे वाढत गेली हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे धोका दिवसागणिक वाढतो आहे. नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तिसरी संभाव्य लाट थोपवणे आपल्याच हाती आहे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मिनी लॉकडाऊनची शक्यता

संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. पण काही नागरिक बेफिकीर राहिले तर आगामी काळात लॉकडाऊन करावा लागू शकतो. घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. आपण प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. ओमिक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका. तसं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button