मुक्तपीठ

मित्राची कुंडली

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

देवानाना नागपूरकर सकाळी उठल्यापासूनच अस्वस्थ असतात. त्या अस्वस्थतेतच ते टीव्ही सुरू करतात आणि दिलीपकुमार गेल्याची बातमी ऐकून ते जास्तच अस्वस्थ होतात. रुपेरी पडद्यावरचा ‘देवदास’, ‘ ट्रॅजेडी किंग’ तर गेला ; आता आपण तर राजकारणातले ‘ देवदास’, ‘ ट्रॅजेडी किंग’ बनत चाललो नाही ना , असा विचार त्यांच्या मनात येतो आणि खोलीतला ऑक्सिजनच संपून गेल्यागत त्यांचा जीव घाबराघुबरा होतो. त्यातून थोडं बरं वाटावं म्हणून ते बाहेरच्या हिरवळीवर येतात, तोच गिरीशभाऊ पाचोरेकरांचा फोन येतो.

देवानाना – ( जड आवाजात) बोला.

गि. पा. – नानासाहेब , कळली का आनंदाची बातमी ?

देवानाना – ( आश्चर्याने ) कसली ?

गि. पा. – (आनंदातिरेकाने) अहो , त्या ‘सीडी’वाल्याच्या जावयाला ‘ईडी’ वाल्यांनी उचलला ना !

देवानाना – त्यात इतका आनंद होण्यासारखं काय आहे ? त्यांनी तर एकाच दगडात आपले चक्क बारा मारलेत !
समोरून काहीच न बोलता फोन कट केला जातो.

संपूर्ण दिवस असाच अस्वस्थतेत घालवल्यानंतर रात्रीच्या शांत समयी देवानाना ‘सागर’ बंगल्याच्या हिरवळीवर अशांत मनस्थितीत एकटेच बसलेले आहेत. वर आकाशात ढगांनी गर्दी केलेली आहे. काळे ढग, पांढरे ढग, पाणी असलेले ढग, पाणी नसलेले ढग, फक्त गर्जना करणारे ढग, बरसणारे ढग, ढगच ढग . आपण याच्यातल्या नेमक्या कोणत्या प्रकारातले आहोत या विचाराने ते उदास झाले आहेत.पार्श्वभूमीवर वाजणाऱ्या, ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया , सुना है के तू बेवफा हो गया.’ या गाण्याने वातावरण अधिकच उदासवाणे झाले आहे. सोडवायला जावा तितका गुंता वाढतच चालला आहे. आपण गाठी सोडवायला जावं तितक्या त्या जास्तच घट्ट होत चालल्या आहेत.आपण कात्रीने गाठी कापण्याआधीच त्यांनी आपलाच धागा बारा फुटांनी कापून टाकला आहे, अशा विचारांनी अस्वस्थ झालेले देवानाना उठून हिरवळीवर येरझारा घालू लागतात. अचानक त्यांना काहीतरी आठवते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आधी स्मितहास्य आणि पाठोपाठ प्रसन्नता पसरते. ‘ युरेका युरेका’ ओरडत त्या आर्किमिडीजसारखं पळत सुटावं असं त्यांना वाटू लागतं, पण आधीच त्या अभिरुप विधानसभेच्या प्रयोगात काल भरपूर पोरकटपणा झालेला आहे आणि काल त्या मार्शलांनी पळायला लावल्यानंतर आज परत स्वतःहून कशाला पळा, असा काहीसा पोक्त विचार त्यांच्या मनात येतो आणि ते मनातल्यामनात उद्याचा कार्यक्रम ठरवून शांतपणे झोपायला जातात.

मोडकळीस आलेल्या एका चाळीचा जिना चढून देवानाना एका अंधाऱ्या खोलीत प्रवेश करतात. समोरच्या भिंतीवर ताज्या फुलांचे हार घातलेल्या दोन तसबिरी लावलेल्या आहेत. समोरच पलंगावर लोडला टेकून, रामदास महाराज बसलेले आहेत. देवानाना आधी त्या दोन तसबीरींना आणि नंतर रामदास महाराजांना नमस्कार करतात. आपल्याही खोलीत आपल्या दोन दैवतांच्या तसबिरी आहेत , फक्त त्यांना अजून तरी हार घालून अगरबत्ती लावावी लागत नाही, या विचारानेही त्यांना हायसे वाटते. देवानाना रामदास महाराजांच्या पाया पडतात आणि आपली कुंडली त्यांच्या हातात देतात.

देवानाना – महाराज, जरा कुंडली पाहून सांगा ना, ग्रहदशा काय म्हणते ते ?

रामदास महाराज – बेटा, तू फक्त कुंडली दाखवायलाच येतोस. आमचा सल्ला नाही ऐकत. मागच्या वेळी आम्ही दिलेला सल्ला ऐकला असता तर आज तू मुख्यमंत्री राहिला असतास . बरोबर की नाही ?

देवा नाना – (नम्रपणे) यापुढे ऐकीन महाराज.

रामदास महाराज – ( कुंडली बारकाईने पाहत) हे पहा मित्र स्थानातला ग्रह वक्री होऊन, म्हणजे ‘यु टर्न’ मारून शत्रू स्थानात जाऊन बसला आहे. अशा वेळी कधीकाळी जिथे फुलं वेचली असतील तिथे गोवऱ्या वेचाव्या लागतात. ज्याला आपण गांडूळ समजतो तो चक्क नाग निघतो.

देवानाना – (मनातल्यामनात) हा तर वर्तमानकाळ झााला. मी तर भविष्य विचारायला आलो आहे. (उघडपणे) पण मग ग्रहदशा कधी बदलेल ? चांगली फळं केव्हा मिळतील ? मित्राशी केव्हा जुळेल ?

रामदास महाराज – ते सांगण्यासाठी तुमच्या मित्राचीही कुंडली पहावी लागेल.

देवानाना – त्यांची कुंडली मी कुठून आणू ?

रामदास महाराज – त्या तुमच्या ‘कुंडली संग्राहक’ सोमय्या मुलुंडकरांना विचारा. त्यांच्याकडे सगळ्यांच्याच कुंडल्या असतात म्हणे !
देवानाना निमूटपणे मुलुंडकडे रवाना होतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button