मुक्तपीठ

उतावळ्या माध्यमांची कपोलकल्पित ‘ब्रेकिंग न्यूज’ !

- अ‍ॅड. योगिनी बाबर

अगा जे घडलेच नाही…!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार, दि. २५ जुलैरोजी पूरग्रस्त चिपळूणचा पाहणी दौरा केला. अत्यंत संयमाने मुख्यमंत्र्यांनी जितक्या नागरिकांशी साधता येईल त्यांच्याशी संवाद साधला. महत्वाचा भाग हाच की, माध्यमांनीही सुरुवातीला हा संपूर्ण दौरा अत्यंत व्यवस्थितपणाने दर्शकापंपर्यंत पोहोचताही केला. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर दोन माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांचाही दौरा त्या ठिकाणी झाला. या दौऱ्यानंतरच विरोधाची माशी शिंकली…! पण अनपेक्षितपणे अपेक्षित असा काहीच मसाला, आरोप, चिखलफेक असे काहीच विरोधकांच्या टप्प्यात आले नाही… आणि बहुधा इथेच भास्कर जाधवांनी चिपळूणच्या रहिवासी स्वाती भोजने यांच्याशी अरेरावी केली, कोकणमायचे अश्रू न पुसताच मुख्यमंत्री मुजोरपणाने माघारी परतले, मुख्यमंत्री आणि भास्कर जाधवांनी एका पूरग्रस्त महिलेचा अपमान केला फलाना फलाना… अशा बातम्यांचा ओघ सुरु झाला. भाजपप्रेमी मुख्य पत्रकारांनी आपल्या अधिकारात या घटनेला उलट सुलट स्वरुप देत मुंबईतून ‘इन हाउस’ विशेष बातमीपत्रही चालवले. चर्चा सत्र, प्रतिक्रियांचा खेळही सुरु केला. एका वृत्तवाहिनीच्या महिला अ‍ँकरने तर अर्धवट माहितीवर थेट भास्कर जाधवांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर जाधवांनी वस्तुस्थिती काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तरी स्वाती भोजने या चिपळूणच्या शिवसेनेच्याच माजी आमदाराची पुतणी असून ती मला माझ्या भावाच्या मुलीसारखी आहे, आपल्या पुतणीवर मी ओरडण्याचा प्रश्नच कुठे येतो… असे सांगण्याचा प्रयत्नही भास्कर जाधवांनी केला. मात्र वास्तवापर्यंत पोहोचायचेच नाही, असे एकंदरच धोरण ठेवून वाट्टेल ते बोला, माहिती नसताना बोला… पण बोलत रहा अशी जणू स्पर्धाच वृत्त वाहिन्यांमध्ये रंगलेली दिसली. अर्थातच विरोधकांनाही आयता विषय मिळाला. टीका सुरु झाली. काही माध्यमांनी थेट स्वाती भोजने यांनाच बोलते केले आणि एकदाचा या वादावर पडदा पडला. स्वाती भाजेने यांची अगतिकता, त्यांची निकड, तातडीची मदत हा विषय बाजूला ठेवून फालतू गोष्टींना नाहक महत्व देणाऱ्या माध्यमांनी ‘अगा जे घडलेच नाही’ ते दाखवण्याचा आणि पसरवण्याचा प्रयत्न केवळ आणि उथळ, उतावीळपणातूनच केला हे वेगळे सांगायला नको.

मुळातच भास्कर जाधव हे नुकीत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष असताना सभागृहात जो काही गदारोळ झाला, त्यातून विरोधी पक्षाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित व्हावे लागले, आता त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. चिपळूणचे आमदार असणाऱ्या भास्कर जाधव यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे. चिपळूणमधील घराघरांतील माणसांना ते नावाने ओळखतात आणि त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी आधी स्वाती भोजने यांची ओळख मुख्यमंत्र्यांना करुन दिली, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना हात जोडून नमस्कार करीत काळजी घ्या, तुमच्या समस्यांचे निराकरण होईल असा संवादही साधला. त्याचवेळी स्वाती यांनी अग्तिकतेने रडत रडत, साहेब तुम्ही यात जातीने लक्ष घाला अशी विनंती केली. तेव्हा जाधवांनी अधिकारवाणीने आणि सहजतेने ठिक आहे, तुझा मुलगा कोठे आहे, असे म्हणत त्यांच्या मुलाकडे निर्देश करीत, अरे आईला समजव… समजव तिला मी येतोच आहे उदया… साहेबांना आत्ता बैठक आहे… काळजी घ्या… असे म्हणत तिथून निघाले. यात कोठेही महिलेचा अपमान, कोकणमायकडे पाठ फिरवणे असे काहीही नव्हते… मग हा उलटा चष्मा कोणाचा…? आपत्तीमध्ये अशा उलट्या चष्म्याची खरेच गरज आहे का? किमान वास्तव काय आहे हे जाणूनही न घेता प्रतिक्रिया दिल्या आणि घेतल्या जातात हा बातमीदारीचा आणखी एक नवा अवतार… किमान अशा अश्रू पुसण्याच्या प्रसंगाचे तरी तमाशे व्हायला नकोत… इतकी खबरदारी माध्यमांनीच नाही तर उथळपणाने आणि घाई घाईने प्रतिक्रिया देणाऱ्या नेतेमंडळींनी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button