महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनचे मंत्री वडेट्टीवार यांचे संकेत

मुंबई : राजधानी दिल्लीतील कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी कोरोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसांत घेतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होते, लाट सौम्य असेल परंतु दुसरी लाट तीव्र निघाली असून याची कोणालाच कल्पना नव्हती, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यात संचारबंदी करून त्याचा फायदा सध्या हवा तसा होताना दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसेच इतर लहान दुकाने असणारेही लॉकडाऊन १०० टक्के व्हावा, अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांत देखील नागरिक कडक लॉकडाऊन करा, अशी मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.




