शर्जील इमामवर देशद्रोहाचा खटला चालविण्याचा कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : कोर्टाने दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या शर्जील इमामवर देशद्रोह आणि यूएपीएसह इतरही अनेक कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. सीएए विरोधी निदर्शनादरम्यान शर्जीलने केलेल्या भाषणांमुळे ही कलमे लावली जातील. शर्जीलने अलीगढ मुस्लीम विद्यापीठ (यूपी) आणि दिल्लीतील जामिया परिसरात ही भाषणे दिली होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी हा निर्णय दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शरजील इमामलवर आयपीसीच्या सेक्शन १२४अ (देशद्रोह), १५३अ, १५३ ब आणि ५०५ आणि यूएपीएच्या सेक्शन १३ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. न्यायालयाने म्हटले आहे की, २०१९ च्या डिसेंबर महिन्यात देण्यात आलेल्या भाषणांसाठी शर्जील इमामला ट्रायलचा सामना करावा लागणार आहे. शर्जीलची ती भाषणे न्यायालयाने भडकाऊ अथवा चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.
शर्जील इमाम आसामला देशापासून वेगळे करण्यासंदर्भातील वक्तव्यांमुळे चर्चेत आला होता. यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शर्जीलविरोधात अनलॉफुल अॅक्टिव्हिटी प्रिव्हेंशन अॅक्टनुसार (यूएपीए) गुन्हा दाखल केला होता.
शर्जीलने अलिगढ मुस्लीम विद्यापीठात १६ जानेवारी २०२० रोजी दिलेल्या भाषणानंतर, त्याच्यावर पाच राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिल्लीसह आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरचा समावेश होता. शर्जीलला बिहारमधून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी शर्जीलविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानी आपल्या भाषणातून केंद्र सरकारबद्दल द्वेष आणि तिरस्कार निर्माण केली होती, यामुळे लोक भडकले आणि डिसेंबर २०१९ मध्ये जामियामध्ये हिंसाचार झाला.




