राजकारण

प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाला सिडकोच जबाबदार : गणेश नाईकांचा संताप

सिडकोने नवी मुंबईतून काढता पाय घ्यावा...

नवी मुंबई : आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय झाला त्याला सिडको जबाबदार आहे. म्हणून आता जास्त हस्तक्षेप करु नये. सिडकोचं कामकाज आता संपलेलं आहे. त्यांनी इथून निघून जावं. सिडकोनं सर्व सूत्र महापालिकेच्या हाती द्यावी, अशा शब्दात संताप व्यक्त करत भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी आज थेट भूमिका स्पष्ट केली.

गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सिडकोच्या कामकाजावर संताप व्यक्त केलाय. नाईक यांनी 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. नवी मुंबई शहरातील काही भूखंड अजूनही नवी मुंबई महापालिकेला मिळालेले नाहीत. ते मिळावेत म्हणून गणेश नाईक यांनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सांगण्यात आलं. या भेटीविषयी बोलताना नाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “नवी मुंबई शहरात असे अनेक भूखंड आहेत; जे अजूनही महानगरपालिकेला मिळालेले नाहीत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली. लवकरात लवकर हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळावेत अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण हे भूखंड लोकांसाठी आहेत. लोकांसाठी घरांच्या गरजेचा विषय महत्वाचा आहे. सध्या कुटुंब वाढल्यामुळे अनेकांना घरांचा विस्तार करावा लागला आहे. त्यामुळे हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळणे गरजेचे आहे. हीच मागणी गेऊन मी अजित पवार यांना भेटायला गेलो,” असे गणेश नाईक म्हणाले.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्या चांगल्याच प्रकाश झोतात आल्या आहेत. प्रभागातील मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार टाकणे आणि योग्य मतदार काढणे, असा गंभीर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शिवाय मतदार याद्यांमधील फेरफारासाठी नावामागे पाचशे रुपये एवढा भाव दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. गणेश नाईक हे फेब्रुवारी महिन्यात महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी गंभीर आरोप केला होता.

राज्यात नवी मुंबईसह पाच महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात महापालिका अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. पालिका अधिकाऱ्यांकडूनच मतदार यादीत फेरफार केला जात असल्याची तक्रार नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button