संजू सॅमसनच्या झंझावाती शतकानंतरही राजस्थान पराभूत
आयपीएल २०२१ : शेवटच्या चेंडूवर पंजाबचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलच्या १४ व्या पर्वातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आलेल्या . थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या ४ धावांनी विजय शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर २२१ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने झंझावती शतक झळकावत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवर संजूला षटकार ठोकता आला नाही, त्यामुळे हा सामना राजस्थानने गमावला. या सामन्यात राजस्थानचा अजून एक खेळाडू चमकला. चेतन सकारिया असं या खेळाडूचं नाव आहे. चेतनने आजच्या सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे.
पंजाब किंग्सने या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या रचली आणि राजस्थानपुढे २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. लोकेश राहुल आणि दीपक हुडा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबला हा धावांचा डोंगर उभारता आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा युवा कर्णधार संजू सॅमननने धडाकेबाज फलंदाजी करत शतक साकारले. पण या सामन्यात पंजाबने चार धावांनी विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती. त्यावेळी संजूने अखेरच्या चेंडूवर मोठा फटका मारला, पण तो झेलबाद झाला आणि राजस्थानला संजूच्या शतकानंतरही सामना गमवावा लागला. संजूने यावेळी ६३ चेंडूंत ११९ धावांची दमदार खेळी साकारली. राजस्थानचे फलंदाज एकामागून एक बाद होत असले तरी सॅमसनने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत या आयपीएलमधील पहिले शतक फटकावण्याचा मान पटकावला.
कर्णधार लोकेश राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार यावेळी घेतला. त्यामुळेच पंजाबच्या संघाला राजस्थानपुढे २२२ धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. आतापर्यंतच्या आयपीएलमधील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. कारण आतापर्यंत एकाही संघाला या आयपीएलमध्ये २०० धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. राजस्थानने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर मयांक अगरवालला यावेळी राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने बाद केले आणि पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले. मयांक बाद झाल्यावर ख्रिस गेल फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने कर्णधार लोकेश राहुलच्या साथीने राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील ३५०वा षटकार खेचला. गेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. कारण रायन परागने बेन स्टोक्सकरवी गेलला बाद केले, गेलने यावेळी २८ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावा केल्या. या सामन्यात गेलला एकदा आणि राहुलला दोनदा जीवदान मिळाले.
धडाकेबाज फलंदाजी करत असलेला ख्रिस गेल बाद झाल्यावर राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली. राहुलने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण राहुलपेक्षा यावेळी हुडा जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. हुडाने यावेळी २० चेंडूंमध्येच आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतक पूर्ण करताना हुडाने यावेळी सहा षटकार आणि एक चौकार लगावला. हुडाने यावेळी २८ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ६४ धावांची तुफानी खेळी साकारली.
दीपक हुडाचे यंदाचे सर्वात जलद अर्धशतक
पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. खास करून दीपक हुडाने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या २० चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. हे यंदाच्या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक ठरले. हुडाने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने शिवम दुबेच्या एका षटकात दोन, तर श्रेयस गोपाळच्या पुढील षटकात त्याने तीन षटकार मारले. त्यानंतर त्याने क्रिस मॉरिसच्याही षटकात एक षटकार मारला. त्याने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.




