Top Newsराजकारण

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; राजहंस सिंह रिंगणात, भाईं जगतापांची जागा धोक्यात

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागूप, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबईच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

मुंबई : राजहंस सिंह
कोल्हापूर : अमल महाडिक
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे
धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल
अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक सामना

राज्यातील सर्वात चुरशीची निवडणूक म्हणून कोल्हापूरच्या जागेकडे पाहिलं जात आहे. या ठिकाणी पारंपरिक राजकीय विरोधक सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबिय हे पुन्हा या निवडणुकीच्या माध्यमातून आमने-सामने आले आहेत. गोकुळच्या वादाची थिणगी ही या निवडणुकीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून अमल महाडिक यांचं नाव निश्चित झालं आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. २०१४ मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

भाईं जगतापांची जागा धोक्यात

मात्र सर्वांच लक्ष मुंबईच्या दोन जागंवरती आहे. कारण मुंबईतील महाविकास आघाडीच्या दोन भाईंच्या जागा धोक्यात आल्या आहेत. या निवडणुकीत 77 नगरसेवकांनी पहिल्या पसंतीचे मत दिल्यानंतर सदस्याचा थेट विजय होतो. काँग्रेसचे संख्याबळ २९ आहे. त्यामुळे काँग्रेससाठी स्वत:चा सदस्य निवडून आणणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पक्षाच्या मुंबई अध्यक्षांचीच विधिमंडळातील खुर्ची धोक्यात आली आहे.

नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळेंना संधी

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही मोठे चेहरे डावलण्यात आले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पत्ता कट झाला होता. त्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, बावनकुळे सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.

अमरिश पटेल रिंगणात

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात खलबत्ते सुरू झाली आहेत. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवारी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांच्या कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

१० डिसेंबरला मतदान

निवडणूक आयोगाने राज्यातील सहा विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलढाणा वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर या निवडणूक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button