देखणी ती पाऊले। जी ध्यासपंथी चालती
वाळवंटातही जी स्वस्तिपदमे रेखती
या अत्यंत समर्पक अशा काव्यपंक्ती ज्या व्यक्तीसाठी चपखल लागू होतात, ते म्हणजे आमचे लाडके भावजी श्री. विवेकानंद रामकृष्ण जगदाळे होत. कर्मयोगी, सेवाभावी, समाजनिष्ठ, विवेक आणि आनंद यांचा उत्कृष्ट मेळ म्हणजेच विवेकानंद जगदाळे… अत्यंत गरिबीतून हलाखीच्या परिस्थितीत आई-वडिलांच्या आशीर्वादाने साक्षर झालेल्या आमच्या कुटुंबाला या विवेकाचा परिसस्पर्श झाला तो १४ मे १९९८ ला,आमची बहीण संवेदना, संयम आणि संस्काराची मूर्ती संगीता व विवेकानंद यांच्या वैवाहिक जीवनाला याच मुहूर्तावर सुरूवात झाली. न्यायालयात लिपिक पदावरील नोकरी, माहेरी असलेली तीच परिस्थिती सासरी. बोरपट्टीतील छोटेसे दोन खोल्यांचे भाड्याचे घर, छोट्या दीर-नणंदांचे शिक्षण, लग्न सर्व जबाबदाऱ्या अत्यंत नेटाने आणि आनंदाने पार पाडत.
तूच माझा जीवनसाथी, तूच माझी स्फूर्ती,
मज नेई यशपथावर, प्रत्येक पावली साथ तुझी
याप्रमाणे दोघांनीही एकमेकांना साथ दिली. आज भावजींचे एकामागून एक यश पाहता, आयुष्याच्या या यशस्वी आनंदी क्षणी मागे वळून पाहताना हे सर्व आठवतंय… आपल्या वडिलांची म्हणजे रामकृष्ण जगदाळे यांची ज्ञानसाधना म्हणजे विवेकानंद होय. सिन्नर तालुक्यातील दहिवडी या छोट्या गावातून आपल्या वडिलांचा जीवन संघर्ष बघत कोणतीही आर्थिक मदत नसताना शेतावर काम करीत भावजींनी शालेय शिक्षण घेतले. कोणतेही पाठबळ नसताना नाशिकसारख्या शहरात अर्धपोटी राहून बी.एस.एल., एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर व्यवसायात देखील अॅड. भूषण लिमये आणि अॅड. सलील पंडितांसारखे सहाध्यायी लाभले. या दोघांनीही भक्कम मैत्रीची साथ कधी सोडली नाही. नामवंत वकील अॅड. एम.आर. साठे यांच्याकडे वकिली व्यवसायाची बाराखडी शिकत व्यवसायाला सुरुवात केली.
जब हौसला बना लिया उंची उडान का
फिर देखना फिजुल है कद आसमान का
वकिली व्यवसायतील अनेक स्थित्यंतरे अनुभवत नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात देखील स्वत:चा ठसा उमटवला. दिवाणी, फौजदारी या शाखांमध्ये श्रेष्ठत्व संपादन करत न्यायालयातील सर्व प्रक्रियेतील लोकांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अॅड. विवेकानंद जगदाळे. व्यवसायात उत्तुंग भरारी घेत असताना मातीतला पाय कधीही न विसरणारा माणूस म्हणजे आमचे भावजी. आजही शेतीवर, काळ्या मातीवर प्रेम तसेच आहे. पन्नाशीचा हा नवतरुण घोड्यावर उन्मत्त स्वार होतो तेव्हा विवेकाचाच नव्हे तर जीवनाचा आनंद समजावून सांगतो.
जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे
भाव वेड्या या मनाला संवेदनाचा छंद आहे
आपल्या वडिलांच्या नावाने स्थापन केलेले स्वर्गीय रामकृष्ण जगदाळे फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाची आवड जोपासत कृष्णा क्रिकेट अॅकॅडमी स्थापना केली आहे. क्रिकेटचा छंद जोपासताना सन २०११ पासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उत्तम आयोजन तसेच राज्यस्तरीय वकील क्रिकेट स्पर्धांचे स्वखर्चाने केलेले नियोजन खूप उल्लेखनीय आहे. अशावेळी नंदुरबारसारख्या उदयोन्मुख संघाला मुक्तहस्ताने मदत केली आहे. खेळाबरोबर सद्भावना जोपासण्याचे अविरत काम भावजींनी केले आहे.
ज्यांच्या अंगणात ढग झुकले
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे
या ओळींप्रमाणे दारी येणाऱ्या विन्मुखाला सन्मुख करून पाठवण्याचे भाग्य जगदाळे दाम्पत्य कधीही सोडत नाही. मग कानिफनाथाच्या मढी येथील जेवणाची पंगत असो किंवा एखाद्या मंदिराचा शिखर व पायरी असो, ‘देणाºयाने देत जावे…’ या उक्तीप्रमाणे दानधर्म चालूच असतो. जीवनाच्या या संघर्ष वाटेवर चालताना देखील कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आघातांना तोंड द्यावे लागले. सामाजिक स्तरावर गावाकडच्या राजकारणात नैतिक सहभाग नोंदवत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने सहभागी होतात. समाजकारण करताना पाय खेचणाऱ्यांची कमतरता नव्हती, मात्र सर्व संकटात भावजी मनोधैर्याने उभे ठाकले आहेत.
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही
या उक्तीप्रमाणे भावजी कायमच उभे राहिले आहेत. मातोश्री जिजाबाई आजी यांच्या मातृपंखाखाली एक कुटुंबवत्सल जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. कुटुंबाला देखील न्याय देत आहेत. मोठी मुलगी सौ. वेदांती शंतनु भालेराव बेंगलोर या ठिकाणी उच्चपदावर कार्यरत असून जावई देखील हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीत व्यवस्थापक पदावर आहेत. दुसरी मुलगी कु. तुळजा ही देखील बीएससी अॅग्री पूर्ण करून सिम्बॉयोसिस कॉलेज पुणे येथे एमबीए करीत आहे. मुलगा चिरंजीव कृष्णा बारावी पूर्ण करीत असून आपल्या वडिलांच्या पावलावर पाय ठेवून विधी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करीत आहे. संपूर्ण कुटुंब व्यवस्थेत सर्वांच्या सुख-दु:खाशी समरस होत कुणाच्याही दु:खात धावून जात त्यांना शेवटपर्यंत साथ देण्याची या कुटुंबप्रमुखांनी परंपरा निर्माण केली आहे. लहान थोरांची काळजी वाहत त्यांना आपले करण्याचे वेगळेच वलय त्यांच्यामध्ये आहे.
माझ्यासारख्या छोट्या माणसाला देखील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत आमचीदेखील आपल्या कुटुंबाप्रमाणे ते काळजी घेतात. यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. यंदा त्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र अॅडव्होकेट्स प्रीमियर लीग २०२४’या कार्यक्रमाला माझ्या समस्त रसाळ कुटुंबियाकडून हार्दिक शुभेच्छा…
असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताºयांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…