फोकसशिक्षण

नाशिकमधील के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

नाशिक : नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्यावर आज पंचवटी येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन दुपारी १२ वाजल्यापासून घेता येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या १९ ऑक्टोबर १९३२ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील देवराम उर्फ पद्मश्री काकासाहेब वाघ व आई गीताई वाघ. वडिलांचा शैक्षणिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांना लहानपणापासून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतीसिंह नाना पाटील, कुसुमाग्रज आणि आयोजा सयाजीबाब वाघ अशा ज्येष्ठांचा सहवास लाभला होता.

वडील देवराम उर्फ पद्मश्री कै. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा वारसा बाळासाहेब वाघ यांनी पुढे समर्थपणे चालवला. त्यांच्या प्रेरणेने १९७० मध्ये के. के. वाघ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी २००६ पर्यंत संस्थेचे उपाध्यक्षपद भूषविले. त्यानंतर आजपर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांचे बीएस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साखर कारखान्यावर कृषी अधिकारी पदापासून केली. पुढे अनेक कारखान्यांवर काम केले. ते तब्बल २२ वर्षे कर्मवरी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. जिल्ह्यातील विविध बँकांवरही त्यांनी काम करून आपल्या कार्याची छाप पाडली. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आज त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button