
महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे. महाराष्ट्राला इतिहास, भूगोल आणि सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगितले जात होते. स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांचेच मोठे योगदान आहे. महाराष्ट्राला आणखी एक परंपरा असल्याचे सांगितले जात होते. पुरोगामित्त्वाचा आणि वैचारिक बैठकीचा वाररा असल्याचा आपल्याला केवढा अभिमान होता. परंतु, अलिकडच्या काळात महाराष्ट्राचा पुरोगामीपणा आणि वैचारिक वारसा आपण केवळ ऐतिहासिक ठेव म्हणून जपण्याचा निर्णय घेतला असावा. विवेकाच्या राजकारणाला सोडचिठ्ठी देऊन सुडाचे राजकारण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय जनता पक्षच त्याच्या हातच्या यंत्रणांचा गैरवापर करतो असे नाही, तर कोणतेही सरकार असले, तरी आपल्या ताब्यातील यंत्रणांना पिंज-यातला पोपट बनवून आपल्याला हवे ते करायला लावण्याची कुप्रथा पडत चालली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या वाटेवर महाराष्ट्राचे राजकारण चालले आहे. संसदीय कारकीर्दीची पन्नास वर्षे ज्यांनी पाहिली आणि या सरकारचे जे शिल्पकार आहेत, त्यांना हे अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण पाहावे लागते आहे. अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही. केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्याची पहिलीच घटना राज्याच्या इतिहासात घडली आहे. त्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रकार घडला. तो ही दोन्ही बाजूंनी. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही मुलांच्या जीभेला हाड नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यातील शीतयुद्ध अगोदर वीस वर्षे चालले आणि त्यांनतर गेली 15 वर्षे त्यांच्यात प्रॉक्सी वॉर सुरू होते. राणे विरूद्ध ठाकरे हे वैर महाराष्ट्रासाठी नवे नसले, तरी आता या वैराने जे रुप धारण केले आहे, ते महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्या, पायाभूत सुविधांची रखडलेली कामे, वाढती बेरोजगारी, नैसर्गिक संकटे, महापूर, अतिवृष्टीने झालेले नुकसान, पावसाने दगा दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे, वाढती महागाई, कोरोनाचे संकट, महिला, दलितांवर होणारे अत्याचार, लोकांची जगण्या-मरण्याची लढाई आदी अनेक समस्या जणू संपल्या आहेत आणि केवळ राणे-ठाकरे वाद हाच महाराष्ट्रापुढचा एकमेव प्रश्न आहे, असे चित्र गेल्या काही दिवसांत दिसत होते. मुद्दे संपले असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या गुद्द्यावर आले आहे.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणे विरुद्ध ठाकरे या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राणे यांना केंद्रात मंत्रिपद देण्यामागे भाजपचा हेतू शिवसेनेला डिवचण्याचा होताच. यापूर्वी ठाकरे यांच्या कुटुंबावर राणे यांनी अनेकदा प्रहार केले. मातोश्री हा टीकेसाठी त्यांच्या जणू जिव्हाळ्याचा विषय होता. ठाकरे कुटुंबावर टीका झाली, आरोप झाले, की शिवसैनिक चवताळून उठतात. कायदा व सुव्यवस्थेचे त्यांना काही देणेघेणे नसते. ते आपल्या पद्धतीने उत्तर देत असतात. रस्त्यावर उतरतात. राडे करतात. शिवसेना आता सत्तेत असल्यामुळे मवाळ झाली होती. उद्धव ठाकरे संयमी असले, तरी ते शिकारी आहेत. सावजाच्या मागे ते धावत नाहीत. सावज टप्प्यात कधी येईल, याची ते वाट पाहत असतात. राणे यांना परिणामाची कधी भीती नसते. मनाला आणि तोंडाला येईल, ते बोलून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याकडून वैचारिकेतेची अपेक्षाही करता येत नाही. असे असले, तरी उद्धव हे आता व्यक्ती नाहीत, तर ते ज्या पदावर बसले आहेत, त्या पदाचा सन्मान मोठा आहे. स्वतः मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांनी त्याचे भान ठेवायला हवे. महाडच्या पूराच्या पाहणीच्या वेळीही त्यांनी कोण सीएम, गेला उडत, अशी जी भाषा वापरली, त्यावरून राणे किती व्यक्तिद्वेषाचे राजकारण करायला लागले आहेत, हे लक्षात येते. आपण काहीही बोललो, तरी संयमी झालेली शिवसेना आता अंगावर येणारच नाही, याची खात्री असल्यासारखे ते बोलत होते. जनआशीर्वाद यात्रेची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हापासून ते शिवसेनेला उचकवण्याचा प्रयत्न करीत होते. भाजपची ही व्यूहनीती आहे. शिवसेनेला ट्रॅप करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेना जाळ्यात अडकली, तर ती जाळ्यातून बाहेर पडणार नाही, असे जे भाजपला वाटते, ते प्रत्येक वेळी खरे ठरतेच असे नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याची राणे यांची भाषा निषेधार्ह आहे. भाजपने त्या भाषेपासून स्वतःला वेगळे केले असले, तरी राजकीय फायदा उठविण्यासाठी या घटनेचा वापर भाजपने सुरू केला आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून, ती खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहेच परंतु गेल्या वेळी भाजपला आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा मिळाल्या. त्या ही टिकविता येतील, की नाही, अशी परिस्थिती होती. त्यातच हे महाभारत घडले.
संगमेश्वरला महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. छत्रपती संभाजी महाराजांना तिथे दगाबाजी करून अटक करण्यात आली, तर राणे यांनी राज्याच्या प्रमुखांवर अश्लाघ्य टीका करून, अटक ओढवून घेतली. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव, तीनही पक्षांत बेबनाव असताना राणे प्रकरणामुळे हे तीनही पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र उभे राहिले. एकदा नव्हे, तर दोनदा उद्धव यांच्यावर टीका झाल्यामुळे शिवसैनिकांना आक्रमक होण्याची, एकत्र येण्याची आयती संधी मिळाली.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक हल्ला चढवून कोणत्याच पक्षाचा फायदा झाला नाही. राणे यांना मंत्रिपद दिल्यामुळे भाजपला किती फायदा होईल, हा संशोधनाचा मुद्दा आहे. त्याचे कारण राणे व त्यांच्या मुलाचा वारंवार पराभव झाला. शिवसेनेतून राणे बाहेर पडल्यानंतर मुंबईत शिवसेनेचे फारसे नुकसान झाले नाही. कोकणातील विधानसभेच्या एखाद-दुस-या जागेचे नुकसान झाले इतकेच. कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झाले. आमदारांवर ईडीची चौकशी लागली. शिवसेना थोडी बॅकफूडवर गेली होती. परंतु, राणे यांचे वक्तव्य शिवसेनेसाठी फायद्याचे आहे. नेते, कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याची यामुळे संधी मिळाली आहे. राणे आणि ठाकरे यांच्यातल्या वैमनस्याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न नक्कीच आहे. परंतु, तो होईल, की नुकसानच संभवते, हे येणारा काळ दाखवून देईल. राणे यांना झालेली अटक, त्यानंतर राज्यात झालेला राडा, राणे यांचा जामीन या घटनांच्या तपशीलात फारसे न जाताही ठाकरे यांच्यावर राणे जेवढा वैयक्तिक हल्ला करतील, तेवढा तो भाजपसाठी तोटा असेल. शिवसेनेला उचकून देऊन ती चक्रव्यूहात अडकली, की भाजप स्वतःच फेकलेल्या जाळ्यात अडकला हे येणारा काळच ठरविणार असला, तरी या निमित्ताने केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्याला अटक होते, त्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ज्या पद्धतीने दखल घेतात, त्यावरून सुडाचे राजकारण अधिक गतीमान होण्याचा धोका आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते अगोदरच वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रसिद्ध आहेत. आता त्यात राणे यांची भर पडली आहे. भाजपने राणे यांच्या अटकेचे राजकीय भांडवल करण्याचे संकेत दिले असल्याने महाराष्ट्राचे राजकारण पश्चिम बंगालच्या वाटेवरून चालले आहे. तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने भाजपचा आक्रमकपणे प्रतिवाद करताना दिसतात, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातून भाजपला आव्हान दिले जाऊ शकते.




