भारतात तिसऱ्या लसीचा पर्याय; रशियाच्या ‘स्पुटनिक’च्या वापरास परवानगी!

नवी दिल्ली : सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध होणार आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे.
रशियाच्या स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे भारताच्या करोनाविरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे. स्पुटनिक लसीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधीची माहिती तपासल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचा तेथील आरोग्य मंत्रालयाने अंतरिम निष्कर्षांत म्हटलं आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्ये लसींचा पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या निर्णयामुळे लसीच्या पुरवठ्याचा प्रश्न सोडवला जाण्याची आशा आहे.




