
कल्याण : कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली होती. त्या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावे हे अपेक्षित नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. ठाण्यात मला आजपर्यंत कुठेच श्रेयवादाची लढाई दिसली नाही. कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी तसं कधीकधी बोलावं लागतं असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष वंडार पाटील यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांचा आजा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आव्हाड हे आज डोंबिवली पूर्वेतील गोलवली परिसरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.




