
अहमदनगर : शिवसेनेमुळं माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज पुढं आलेत. तसेच सायकल चोरणारा मुख्यमंत्री झाला होता, असं म्हणत ‘मतलब के लिए कुछ लोग बाप बदल लेते है’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केली. दरम्यान, शिवसेनेचे जुने कार्यकर्ते कोणत्याही पदाच्या अपेक्षेने काम करत नव्हते. बाळासाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक काम करायचा. आत्ताच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे. यावेळी आपल्या गावात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे भूत येवू नये यासाठी वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसेना हा पक्ष नाही, संघटना नाही, तर तो एक विचार आहे. शिवसेना ही मुसलमान विरोधी नसून देशविरोधी भूमिका घेणारांच्या विरोधात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोनई येथे पार पडला. मंत्री शंकरराव गडाख यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी पुन्हा तुफान फटकेबाजी केली. जर शिवसेना संपली तर तुमचं नुकसान होणार आहे. शिवसेना मोठी झाली तर फायदा तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशी सूचना गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलीय. आजची शिवसेना व पूर्वीची सेना यात फरक पडलाय. पूर्वीच्या काळी आम्ही सत्तेसाठी शिवसेनेबरोबर आलो नाही. त्याकाळी पोलीस आमच्या पाचवीला पुजलेला होता. त्यांचं आमचं जणू काही लव्ह मॅरेजच होतं, अशा विनोदी शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना जुना काळ आठवूण दिला आहे. तसेच त्यावेळी काँग्रेसची एक हाती सत्ता होती. सेनेच्या शाखेचा बोर्ड लागला की लगेच नोटीस यायची, असेही ते सांगायला विसरले नाहीत.
बाळासाहेब नसते तर माझ्यासारखा माणूस आमदार सोडा साधा सरपंचही झाला नसता. २५ वर्षांचा असताना मी शिवसेना जिल्हाप्रमुख झालो. ९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ अनेक महिने जेलमध्ये होतो. अशा परिस्थितीत शिवसेना उभी राहिली. आता फक्त कार्डापुरते आहेत काही लोक सेनेत. तुम्ही सेनेकडे मागता, मात्र तुम्ही संघटनेला काय दिले हेही बघा ना? असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले आहेत. तसेच अनेक लोक सोडून गेले मात्र शिवसेना अजूनही भक्कम आहे. भुजबळ गेले तेव्हा पहिला धक्का होता. नारायण राणे गेले, शिवसेना उभीच आहे. त्यानंतर राज साहेब गेले तरी शिवसेना उभीच आहे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच आपल्या विनोदी शैलीत, तेरा क्या होगा कालिया? म्हणत माझ्या भाषणाची पद्धतच तशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मागे मी बोलता बोलता हेमामालिनी बोललो तर दोन दिवस तेच चालू होतं. मात्र माझ्या मनात तसं काही नव्हतं, असेही सांगायला ते विसरले नाहीत.




