Top Newsराजकारण

कोरोनाच्या संकट काळात मोदींनी शेतकऱ्यांना वर्षभर रस्त्यावर सोडले; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली : भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं. या राजानं कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना एक वर्षभर रस्त्यावर सोडले, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. राहुल यांनी उधम सिंग नगरमधील किच्छा येथे उत्तराखंडी किसान स्वाभिमान संवाद या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने जशी वागणूक दिली तसा काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांशी कधीही वागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस सत्तेत असताना शेतकर्‍यांसाठी कधीही आपले दरवाजे बंद करणार नाही. आम्हाला शेतकरी, गरीब आणि मजूर यांच्यासोबत भागीदारी करून काम करायचे आहे जेणेकरून प्रत्येक विभागाला वाटावं की हे त्यांचे सरकार आहे, असं म्हणत सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

भाजपला खरा हिंदुस्थान दाखवू, असं म्हणत निशाणा राहुल गांधी यांनी साधला आहे. रायपूरमध्ये राहुल गांधी यांनी, धोका कोणत्या गोष्टीचा आहे? सर्वात पहिला भयंकर धोका म्हणजे भाजप आज एक देश दोन देशांमध्ये विभागत आहे. दोन नवे देश बनवले जात आहेत. एक देश निवडक करोडपतींचा. त्या देशात विमाने, अद्ययावत तंत्रज्ञान, स्टॉक मार्केटचा पैसा आहे. त्या देशात जेवढी देशाची संपत्ती तुम्हाला हवी, तुम्ही घेऊ शकता. दुसरा देश आपल्या प्रिय देशवासीयांचा, कोट्यवधींचा देश, असं म्हटलं आहे. ७० वर्षांत काय झालं? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करता, तेव्हा तुम्ही काँग्रेसचा नाही तर हा देश घडवणाऱ्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करता, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी यावेळी भाजप भारतात दोन देश करू पाहात आहे, या आपल्या विधानाचा देखील पुनरुच्चार केला.

एक श्रीमंत देश शे-पाचशे लोकांचा आणि दुसरा देश भारतातल्या कोट्यवधी नागरिकांचा. त्यांना वाटतं दोन देश बनवल्यामुळे गरीबांचा देश शांत बसून राहील. गरिबांमध्ये शक्ती नाही. भारतातला गरीब घाबरतो. पण हिंदुस्थानमधला गरीब घाबरत नाही, असं देखील ऱाहुल यांनी म्हटलं आहे. जर या देशाला कुणी इथपर्यंत पोहोचवलंय, देशात प्रगती झाली आहे, तर ती कुठल्या पक्षामुळे झालेली नाही. ती भारतातल्या गरीबांनी घडवून आणली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button