
मुंबई/लखनऊ : शिवसेना खा. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. मात्र आज सोमय्यांच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी अगदी खरमरीत शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा असं म्हणत राऊतांनी सोमय्यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
राऊत म्हणाले की, माणसाने एकदा शेण खायचं ठरवलं तर शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा. गुन्हे किती हवे ते केंद्र सरकारकडून ईडीकडून दाखल करु द्या. ईडीचे लोकं येतात आमच्या लोकांना पकडतात. आमच्याविरोधात खोटे स्टेटमेंट घेत आहेत. मला माहित आहे सर्व… दबाव टाकू, जेलमध्ये टाकू… अनिल परबांविरोधात हे स्टेटमेंट द्या, संजय राऊतांविरोधात हे स्टेटमेंट द्या….. हे चालू आहे त्यांचे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले की, कोण आहेत किरीट सोमय्या ते, मुळात किरीट सोमय्या कोण ज्यांच्यासाठी आम्ही उत्तर द्यावे आणि अमूक करावे. गुन्हा दाखल करायचा तर करा, मी काय घाबरतो? गुन्हे दाखल करा, खटले चालवा, हे काय आत्ता आहे का? दंगलीच्या काळापासून माझ्याविरोधात खटले चालू आहेत. हे जेव्हा शेपट्या घालून बसले होते बाबरीच्या काळात तेव्हापासून आमच्यावर खटले चालू आहेत ते अजून सुरु आहेत. मला चिंता नाही, असं राऊत म्हणाले.
सिद्ध करु द्या, कोणी जे आरोप करत असतील तर सिद्ध करु द्या, आरोप करायला काय जाते. मोदी आणि शाहांवर काय कमी आरोप होतायत का? केंद्र सरकारवर काय कमी आरोप होत आहेत का? फडणवीस मुख्यमंत्री होते कमी आरोप झाले का? आरोप करायला काय?, अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेकडून आगामी निवडणुकांची तयारी
देशात विधानसभा निवडणुकांपूर्वी देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा जिंकण्यासाठी भाजप-सेनेत ठक्कर पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी लोकसभा निवडणुकांची तयारी करतोय असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेनेचे आगामी मिशन जाहीर केले.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशात शिवसेना निवडक ५० ते ५५ जागांवर लढणार आहे. हा पक्षविस्ताराचा एक कार्यक्रम आहे, त्याताही काही उमेदवार पश्चिम उत्तर प्रदेश, लखनऊच्या आसपासचे आहेत. पाचव्या पेजमध्ये अयोध्या, बंका, फैजाबाद या भागात शिवसेनेने उमेदवार उभे केलेत. सहाव्या सातव्या पेजमध्ये वाराणसी, अलाहाबाद येथे उमेदवार असतील. ही शिवसेनेची २०२७ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा लढणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना साधारण १०० उमेदवार उभे करू शकेल का याची ताकद पाहतोय, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर झालेल्या गोळ्याबारावरून संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, देशातील प्रमुख नेत्यावर उत्तर प्रदेशसारख्या योगींच्या राज्यात गोळ्या झाडण्याची हिंमत कोण करेल? कायदा सुवस्थेच्या बाबतीत त्यांचा एवढा गवगवा सुरु आहे की, आम्ही फार कठोर आहोत, कडक आहोत, कायदा सुव्यवस्था आमची फार मजबूत आहे. आणि देशातील एका प्रमुख नेत्यावर ५ गोळ्या फायर होतात आणि एकही गोळी लागत नाही? सगळ्या गोळ्या टायरवर लागतात? याचा अर्थ असा की, भाजपला ओवेसींचा उत्तर प्रदेशमध्ये हवा तसा उपयोग होत नाही. लोकांचे लक्ष्य वेधून ते घेत नाहीत. मुस्लीम त्यांच्याकडे आकर्षित होत नाहीत. मग त्यांना पिक्चरमध्ये कसे आणयाचे ते अशाप्रकारचे काहीतरी असू शकेल, अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांच्या मालमत्तेची विशेष चर्चा सुरु आहे. यावरूनही संजय राऊत यांनी योगींवर टीका केली आहे. योगींना आम्ही ओळखतो, मालमत्तेची किंमत वाढते. योगी हे खरे फकीर आहेत हे मला माहित आहे. त्यांच्या मालमत्तेविषयी मी बोलणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींना चांगला पाठिंबा मिळतोय. पण अखिलेश यादव हे विजयाच्या दिशेने कूच करतायत हे चित्र स्पष्ट आहे, असा दावाही राऊतांनी केला आहे.
संजय राऊत मित्रपरिवाचा १०० कोटींचा कोविड सेंटर घोटाळा : सोमय्या
किरीट सोमय्या यांनी आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने १०० कोटी रुपयांचा जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणला चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, खासदार संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकरांची लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसेस ही बनावट कागदी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून दहिसर, वरळी एनएससीआय, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यात आले. हे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. ईडीने केलेल्या झापेमारी दरम्यान याबाबतची कागदपत्रे सापडल्याचे त्यांनी म्हटलं.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला लिहिलेल्या पत्रात सोमय्या म्हणतात की, “मुंबई महापालिकेने वैद्यकीय कर्मचारी पुरवण्यासाठी आणि प्रत्यक्षात कोविड केंद्रे चालवण्यासाठी लाइफलाइन रुग्णालयाला देण्यात आली. दहिसर, एनएससीआय वरळी, मुलुंड, रेसकोर्स महालक्ष्मी केंद्राचे कंत्राट लाइफलाइनला दिले. जून २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात, कागदपत्रांची तपासणी करताना असे आढळून आले की लाइफलाइन हॉस्पिटल व्यवस्थापन सेवा अस्तित्वात नव्हती. एमसीजीएमला कोणतेही दस्तऐवज, योग्य अर्ज, अनुभवाचे प्रमाणपत्र, काहीही मिळाले नव्हते, परंतु या केंद्राला आंधळेपणाने कंत्राट वाटप केले. एमसीजीएम आणि या कंपनीमध्ये प्रत्यक्ष करार कधीच झाला नव्हता.




