Top Newsअर्थ-उद्योग

नाशिकमधील इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द

नाशिक : रविवार पेठेतील इंडिपेन्डन्स को. ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर रद्द केला. त्यामुळे आजपासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

इंडिपेन्डन्स बँकेचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेला पाठविला होता. तसेच बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचाही प्रस्ताव होता. बँक दिवाळखोरीत निघाली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कामकाजासाठी योग्य ती स्थिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ५६ सह कलम ११ (१) आणि कलम २२ (३) (ड) या तरतूदींचे पालन बँकेकडून होताना दिसत नसल्याचे ताशेरे आरबीआयने ओढले आहेत. बँक सुरू ठेवणे ठेवीदारांच्या हितासाठी अनुकुल नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरित परिणाम होईल असेही आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे बँकेला बँकिंग व्यववसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, १९४९ चे ५६ तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी होत असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लावण्यात आले होते. बँकेची सद्यस्थितीतील रोखीची परिस्थिती पाहता ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी नव्हती.त्यावेळी बँकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील असे आरबीआयने म्हटले होते मात्र आता बँकेचा परवानाच रदद करण्यात आला आहे. २३ वर्षांपूर्वी या बँकेची स्थापना झाली होती.

बँकेच्या संचालक मंडळात विविध राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींची वर्णी लावण्यात आली होती. यामध्ये बँकेचे संस्थापक अध्यक्ष रऊफ पटेल तर विद्यमान अध्यक्ष म्हणून माजी महापौर पंडितराव खैरे यांचे चिरंजीव योगेश खैरे. उपाध्यक्षा म्हणून भाजपाच्या आमदार सीमा हिरे याशिवाय इतर पदाधिकार्‍यांमध्येही काँग्रेस, शेकाप, भाजप आदी पक्षांशी संबंध असणार्‍या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button