मध्य रेल्वेवर तब्बल ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक; ३५० लोकल गाड्या रद्द
कोकणात जाणाऱ्या गाड्यांसह नाशिक-पुण्याकडे जाणाऱ्या १०० एक्सप्रेस ३ दिवस बंद

मुंबई : मध्य रेल्वेवर तब्बल ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ३५० लोकल ट्रेन देखील या दिवशी धावणार नाहीत.
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि ६ व्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत.
कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट (जलद लोकल) लोकल गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर डायव्हर्ट केल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र अजूनही दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं होतं. यापैकी पहिला मेगा ब्लॉक येत्या २२ आणि २३ जानेवारीला घेण्यात आला. तर ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारा दुसरा मेगाब्लॉक हा ७२ तासांचा आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असंही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं आहे.




