
नवी दिल्ली : पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदारसंघात जास्तीत जास्त १००० लोकांच्या सार्वजनिक सभांना परवानगी दिली आणि घरोघरी प्रचारासाठीचे नियमही शिथिल केले आहेत.
एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, घरोघरी जाणाऱ्या प्रचारात सुरक्षा कर्मचार्यांना वगळून आता १० जणांऐवजी २० लोक सहभागी होऊ शकतील, तर इनडोअर प्रचार सभांसाठी लोकांची क्षमताही ३०० वरून ५०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांसह नियुक्त मोकळ्या जागांवर प्रचारासाठी व्हिडिओ व्हॅनलाही परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना १५ जानेवारीपर्यंत प्रचार सभा, रोड शो आणि बाईक रॅली आणि अशा इतर प्रचार कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. १५ जानेवारी रोजी आयोगाने हे निर्बंध २२ जानेवारीपर्यंत आणि नंतर ३१ जानेवारीपर्यंत वाढवले होते.
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या दोन टप्प्यात १० आणि १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये ३७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर पंजाबमधील सर्व ११७ विधानसभा जागांसाठी २० फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.




