‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे !
संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

सांगली : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी भिडे यांनी टीका केली आहे. वाईनविक्रीचा निर्णय धर्मविरोधी असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर नाईट लाईफ संकल्पनेवरही भिडे यांनी हल्लाबोल केला आहे. नाईट लाईफ म्हणजे सर्वनाश असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींवरही त्यांनी आगपाखड केली आहे.
‘लिव्ह इन रिलेशनशीप’ संकल्पनेबाबत बोलताना भिडे यांनी न्यायाधिशांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. लिव्ह इन रिलेशनशीपचा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. माझ्या या वक्तव्यावर अनेकांना राग येईल, माझ्यावर गुन्हे दाखल होतील. काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत. रामशासत्री प्रभुने यांनीही भरसभेत म्हटले होते तुला देहांताशिवाय दुसरे शासन नाही, असे भिडे म्हणाले. पत्रकार परिषदेत भिडे म्हणाले की, महाभारत काळात यादवांच्यात प्रचंड भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता वाढली होती. त्यामुळे यादव एकमेकांचा जीव घेऊ लागले. त्यांना रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना नरसंहार करावा लागला. महाराष्ट्रात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पण आता श्रीकृष्ण नाहीत, हे लक्षात असू द्या. राज्य सरकारने घेतलेला निर्णय संतापजनक, राष्ट्रघातक आणि सर्वनाश करणारा आहे. या मंत्रिमंडळात राग येणारा कोणी भीम जिवंत नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एकही मंत्री किंवा आमदार बोलत नाही हे लांच्छनास्पद आहे, अशी खरमरीत टीका भिडे यांनी केली आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाबाबत बोलताना भिडे म्हणाले, राज्य सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा एकही मंत्री, एकही आमदार या बैठकीतून बाहेर पडला नाही. असा काही निर्णय करायचा असेल तर तुमच्यात राहण्याचे पाप मी करणार नाही, असल्या आमदारकी, मंत्रीपदावर मी थुंकतो. असे एकही मंत्री अथवा आमदार म्हटला नाही, हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही, ही आमजे दुर्दैव आहे असेही संभाजी भिडे म्हणाले.
राज्यपालांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी आहेत. त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घटनेत दुरुस्ती करून घ्यावा, असेही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय चुकल्याचे स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी मांडले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.




