
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत आणखी एक लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे पर्ये होता. तेथूनही काँग्रेसचे कधीच पराभूत न झालेले प्रतापसिंह राणे आणि भाजपकडून त्यांची सून उभी ठाकली होती. ही लढतही आता संपली आहे.
माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे हे काँगेसकडून १२ व्यांदा आमदारकीला उभे ठाकणार होते. तर भाजपत गेलेला त्यांचा मुलगा विश्वजित राणे हे वाळपई येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने प्रतापसिंह यांच्या मतदारसंघात त्यांची सून आणि विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या यांना सासरे प्रतापसिंह राणेंविरोधात उभे केले होते. यानंतर प्रतापसिंह राणे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी उतार वयामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
एकाच घरातून सासरे-सून लढत असल्याने राणे कुटुंबासमोर पेच निर्माण झाला होता. सत्तरीच्या इतिहासात प्रथमच सासरे व सून अशी लढत पाहावयास मिळणार होती. काही दिवसांपूर्वी प्रतापसिंग राणे व विश्वजित राणे यांच्यात शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली होती. त्यामुळे त्या कुटुंबातील अंतर्गत कलह दिसून आला होता. प्रतापसिंग राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे सुद्धा प्रचार शुभारंभ करण्यास उपस्थित होत्या. परंतू त्यांनी आज उमेदवारी मागे घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभेत ५० वर्षे पूर्ण झाली. आता निवडणुकीच्या राजकारणातून मला निवृत्त होऊद्या”, असे ते मागे म्हणाले होते. यामुळे पर्येत आता काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. प्रतापसिंह राणे हे यावेळी निवडणूक लढण्यास उत्सूक नव्हते. तरी देखील काँग्रेसने त्यांची मनधरणी करून उमेदवारी जाहीर केली होती. प्रतापसिंह यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता.
सिद्धेश नाईकांचे बंड थोपवण्यात भाजपला यश
कुंभारजुवेत सिद्धेश नाईक यांचे बंड अखेर मावळले आहे. भाजपने त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली असून वास्को मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर कुंभारजुवेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या उपस्थितीत सिद्धेश यांनी आपण पक्षासोबतच राहाणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपने त्यांचे मन वळविण्यात यश मिळवले आहे. पत्रकार परिषदेत सिद्धेश यांनी कुंभारजुवेत आपण पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासोबत असेन असे जाहीर केले.
बुधवारी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताच भाजपमधील बंडाळी उफाळून आली होती. कुंभारजुवेत केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जि.प. सदस्य सिद्धेश यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली, तेव्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा आग्रह त्यांनी त्यांच्याकडे धरला होता. परंतु सिद्धेश यांचे मन वळविण्यात भाजप नेत्यांना यश आले.
भाजपने कुंभारजुवेत विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जेनिता यांना भाजपने तिकीट दिले आहे. जेनिता पक्षाच्या राज्य सचिव आहेत. तसेच जुने गोवेच्या सरपंच आहेत. सिद्धेश हे या मतदारसंघात भाजप तिकिटाचे प्रबळ दावेदार होते. प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, सिद्धेश यांनी तिकीट मागण्यात काही गैर नाही. श्रीपाद नाईक यांचे पुत्र म्हणून ते पुढे आलेले नाहीत तर अभाविपवर त्यांनी काम केले आहे. पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या निभावल्या आहेत, त्यामुळे आता त्यांची सचिवपदी नियुक्ती करून वास्को मतदारसंघाची जबाबदारी आम्ही सोपविली आहे.
सिद्धेश अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास ५०० मतेसुध्दा मिळवू शकणार नाहीत, असे जे विधान पांडुरंग मडकईकर यांनी केले होते, त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली. अशा प्रकारची विधाने करू नका, असे आपण मडकईकर यांना बजावले आहे, असे तानावडे यांनी सांगितले. बहुतांश ठिकाणी बंड मावळले आहे. सांताक्रुझमध्ये अनिल होबळे व गिरीश उस्कैकर यांचा विरोध मावळल्याचा दावा तानावडे यांनी केला.
उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश यांची तुलना करू नका. सिद्धेश यांनी विद्यार्थी चळवळीपासून अनेक पदांवर पक्षासाठी काम केलेले आहे, असे तानावडे म्हणाले. सिद्धेश म्हणाले की, पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडीन. वास्को मतदारसंघात काम करीन.




