Top Newsस्पोर्ट्स

अंडर-१९ विश्वचषक क्रिकेट : भारताचा युगांडावर तब्बल ३२६ धावांनी विजय; उपांत्यपूर्व फेरीत धडक

गयाना: भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार प्रदर्शन कायम ठेवलं आहे. भारतीय संघाने युगांडाचा तब्बल ३२६ धावांनी दारुण पराभव केला आहे. भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या विराट विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे. कर्णधार यश धुलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने दुबळ्या युगांडावर मोठ्या विजयाची नोंद केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारताच्या दमदार कामगिरीसमोर नवख्या युगांडाचा निभाव लागला नाही. पूर्णपणे एकतर्फी झालेला हा सामना भारताने तब्बल ३२६ धावांनी जिंकला. अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने युगांडासमोर विजयासाठी विशाल लक्ष्य ठेवले होते.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धिरित ५० षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात ४०५ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ १९.४ षटकांत फक्त ७९ धावा करु शकला. युगांडा संघाच्या नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार पास्कल मुरुंगी याचा अपवाद वगळता एकाही युगांडाच्या फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. यात कर्णधार पास्कलने सर्वाधिक (२४) धावा केल्या. फलंदाजीत विशेष चमक न दाखवू शकलेल्या कॅप्टन निशांत सिंधूने गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने तब्बल ४०५ धावा करत कमाल केली. यामध्ये अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांनी अप्रतिम शतकं लगावली आहेत. याआधी भारताने अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत २००४ मध्ये स्कॉटलँडविरुद्ध ४२५ धावा केल्या होत्या. सामन्यात नाणेफेक जिंकत युगांडा संघाने गोलंदाजी घेतली. इथेच त्याच्यांकडून मोठी चूक झाली कारण भारतीय संघाने याच गोष्टीचा फायदा उचलत धमाकेदार फलंदाजी केली. हरनूर सिंग, निशांत संधू प्रत्येकी १५ धावा करुन बाद झाले. पण अंगकृष आणि राज बावा यांनी डाव सांभाळत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यामध्ये अंगकृष याने १४४ धावा केल्या. त्याने १२० चेंडूत २२ चौकार आणि ४ षटकार लगावले. तर राज याने तब्बल १६२ नाबाद धावा केल्या. त्याने १०८ चेंडूत १४ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

राजने तोडला शिखरचा विक्रम

राज याने नाबाद १६२ धावा करत भारतीय फलंजाज शिखर धवनचा १७ वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. शिखरने २००४ मध्ये स्कॉटलँडविरुद्ध १५५ धावा केल्या होत्या. अंडर १९ विश्वचषकातील ही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button