आगीत होरपळलेल्यांना तीन रुग्णालयांनी उपचार नाकारले; महापौरांचे चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबईत आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक, गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले अशी नावंही किशोरी पडणेकर यांनी सांगितली आहेत. या रुग्णालयांनी अशा आणिबाणीच्या वेळेला उपचार का नाकारले? याबाबत चौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महापौर म्हणाल्या आहेत. या रुग्णालयाकडून उपचार का नाकारले याबाबत महापौरांनी स्पष्टीकरण मागवले आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतर समाधानकारक उत्तर नसेल तर या रुग्णलयांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
मुंबईच्या महापौरांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याला अॅडमिट करून घेऊन, त्याला स्थिर करणे हे रुग्णलायचे प्रथम कर्तव्य असते, ते या रुग्णलयांनी का केलं नाही? याची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच घटनास्थळी असलेल्या उपकरणांचा वेळीच योग्य वापर केल्यास अशा दुर्घटनांवर मात केली जाऊ शकते असेही ते म्हणाले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.
आगीची घटना दुर्देवी असून आग लागल्यानंतर तत्काळ घटनास्थळावर महापालिकेचे अग्निशमन दल पोहोचले होते. जितक्या लोकांना बाहेर काढणे शक्य झाले तितक्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या टीमने सुद्धा बऱ्याच नागरिकांना इमारतीबाहेर काढण्याचे काम केले. नायर व कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली त्यांना धीर दिला, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, वीजपुरवठा करणारी यंत्रणा ही सहा महिन्यातून एकदा तपासली गेली पाहिजे. त्यासोबतच आठवड्यातून शनिवार व रविवारला उंच इमारतीमधील नागरिकांचे विविध गट तयार करून त्यांना अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
दुर्घटनेला कोण जबाबदार आहे?, अमृता फडणवीसांचा सवाल
मुंबईत अशा प्रकारे होत असलेल्या अपघातांना जबाबदार कोण?, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. आपलं शहर मुंबई आपल्यासमोर उद्ध्वस्त होत आहे. इमारतींच्या अनुचित उंचीमुळे आपण आपल्या घरातच मरतोय, सरकारी रुग्णालयात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये मरतो, खड्डे आणि अनागोंदीने भरलेल्या रस्त्यांवर रस्ते अपघातात आपण मरतो, कोण जबाबदार आहे?, असा सवाल अमृता फडणवीसांनी उपस्थित केलाय.
दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहानुभुती व्यक्त करतो. पण दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयाने दाखल करून द्यायला नकार दिल्याची माहिती आहे. याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढल्याचं सांगितलं जात आहे. जर हे खरं असेल तर महापालिका आणि राज्य प्रशासनानं तात्काळ याची दखल घेत कारवाई करावी. संबंधित जे जे कोणी याला जबाबदार आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.



