Top Newsराजकारण

भाजप आ. आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्यास अटक

मुंबई : भाजपचे आ. आशिष शेलार यांनाही जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. गुन्हे शाखा आता आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय.

दोन वेगवेगळ्या फोनवरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय. शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आता शेलार यांना धमकी देणाऱ्याला मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

ओसामा समशेर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचं वय ४८ वर्षे आहे. गुन्हे शाखा आता या आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय. शेलार यांच्या वतीनं वांद्रे पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा जमिनीबाबतचा एक वाद आहे आणि या वादामागे आशिष शेलार यांचा हात असल्याचा संशय या आरोपीला होता. त्यातूनच त्याने शेलार यांनी धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.

यापूर्वी २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्याआधी आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती समोर आली होती. त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button