Top Newsराजकारण

हिंदुत्वावरून देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा महापालिकेवर फडकवायचा आहे. मला अलीकडच्या काळात भाजपाच्या भगव्याचा विशेष उल्लेख करावा लागतो. कारण भगव्याची शपथ घेणारे अशा लोकांसोबत आहेत ज्यांना भगव्याचा मान नाही, सन्मान नाही, ज्यांना स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते अशां लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. ते लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात अशी बोचरी टीका भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे.

पुण्यात भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्धाटन करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आले. त्यात २ शिवसेनेचे खासदार आहेत. तेव्हा संसदेत निलंबित सदस्यांना माफी मागण्यास सांगितले त्यांनी असं विधान केले की, आम्ही माफी मागायला सावरकर आहोत का? भ्रष्टाचाराच्या पैशातून ज्यांचे महाल पोसले गेले. ते सावरकारांचा अपमान करतात त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असं त्यांनी म्हटलं.

 

त्याचसोबत होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही सावकरवादी आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. होय आम्हाला गर्व आहे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करतो. भारत चोहीकडे प्रगती करतोय. कोविड काळात मोदींच्या नेतृत्वात भारतीय लस तयार झाल्या नसल्या तर काय अवस्था झाली असती? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.

अमेरिका, इंग्लंड, रशियासारख्या देशांनी आमचं लसीकरण झाल्याशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही मग तुम्ही जगला की मेला आम्हाला पर्वा नाही असं भारताला म्हटलं असतं. पण मोदींच्या नेतृत्वात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, वैज्ञानिकांना हिंमत देऊन हवी ती मदत देऊन भारतीय जनतेला मोफत लस उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्र सरकारने १० कोटी जनतेला लस दिल्या त्या लसी केंद्र सरकारने दिल्या. मोदींच्या नावानं शंख फोडणारे हे लोक जनतेचा विश्वासघात करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात सुरु झाले आहे. २०२२ मध्ये जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची असेल असं अनेक संस्थांनी सांगितले आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचारामुळे नोकरशाही संपुष्टात

महाराष्ट्रात वसुलीशिवाय काही सुरु नाही. नोकरशाही संपुष्टात येते. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने महाराष्ट्रातील नोकरशाहीला पोखरुन टाकलं. सामान्य माणसांचा विचार करायला कोणी तयार नाही. पुणे महापालिकेला १ पैसा कोविड काळात राज्य सरकारने दिला नाही. कोविड काळात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होते असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत; अजित पवारांवर निशाणा

‘जे पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, अशा शब्दात फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे शहराचा पाणीपुरवठा ३ डिसेंबरपासून कमी केला आहे. भामा आसखेड धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

पुण्याच्या पाणी प्रश्नावरुन सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी जे पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिलाय. निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ज्या दिवशी आम्ही शक्ती प्रदर्शन करुन त्या दिवशी आम्हाला एवढी छोटी जागा पुरणार नाही. पुणे महापालिकेत जास्त संख्येनं भाजपचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा करत फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं.

मला प्रश्न विचारला की हे शक्तीप्रदर्शन आहे का? मी सांगितलं हे कार्यकर्ते उत्साहानं आले आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करायचं म्हटलं तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकेल. मला अलिकडच्या काळात भाजपचा भगवा सांगावा लागतो. ज्यांना भगव्याचा मान नाही, हिंदुत्ववादी म्हणून घ्यायची लाज वाटते, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

या ठिकाणी वसूली हा एकच धंदा आहे. इथली नोकरी संपुष्टात येतेय. नेत्यांनी नोकरशाही संपुष्टात आणली. नेतेच वसुली, सक्तवसुली करत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला. तर पुण्यात आमच्या महापालिकेनं रस्त्यावर येऊन काम केलं. सामान्यांसाठी आमची महापालिका जागत होती. राज्य सरकारनं काय केलं? एक पैशाचंही अनुदान राज्य सरकारनं दिलं नाही. महापौर कोरोना काळात रस्त्यावर होते. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलं. भाजप हे सेवेचं संघटन आहे, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button