राजकारण

लातूर जिल्हा बँकेत काँग्रेसच्या पॅनेलचा दणदणीत विजय

लातूर : राज्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाचं वारं सुरु आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं विविध जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसतंय. लातूर जिल्हा बँकेत काँग्रेसच्या सहकार पॅनेलनं १८ जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपला एका जागेवर विजय मिळाला आहे.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे.१९ पैकी काँग्रेसचे १८ उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपप्रणीत लोकशाही पॅनेलचा एक उमेदवार निवडून आला आहे.

चिठ्ठीचा कौल भाजपला

जिल्हा बँकेत भाजपचा एक उमेदवार निवडून आला आहे. विशेष म्हणजे या एक जागेसाठी देवणी गटातून चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूच्या उमेदवाराला समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढावी लागली त्यात भाजपाचे भगवानराव पाटील तळेगावकर यांना विजयी ठरवण्यात आले.

या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने आमदार धीरज देशमुख यांनी प्रचाराची जवाबदारी सांभाळली ते स्वतःही उमेदवार होते. भाजपकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार रमेश कराड यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली. १९ पैकी १० उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. आज ९ जागांची मतमोजणी पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलनं ८ जागा तर भाजपच्या लोकशाही बचाव पॅनेलचा १ उमेदवार निवडून आला आहे. भाजपच्या पॅनेलचे अर्ज बाद झाल्यानं त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचंही म्हटलं होतं. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली नव्हती.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलच्या विजयानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला आहे. धीरज देशमुख यांनी मतदारांनी आम्हाला कौल दिलेला आहे. जिल्हा बँकेनं गेल्या तीन दशकांपासून चांगल्या प्रकारे काम केलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचा विस्तार करणार असल्याचं धीरज देशमुख म्हणाले. लातूर जिल्हा बँकेचा लौकिक राज्यात आणि देशात आहे. जिल्हा बँकेची यशस्वी परंपरा पुढील काळात जपणार असल्याचं धीरज देशमुख म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button