
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय. ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या खुर्शीदांच्या नव्या पुस्तकातील हिंदुत्वाच्या तुलनेमुळे खुर्शीद वादात सापडलेत. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आलाय. दिल्लीतील वकील विवेक गर्ग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तालयात खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील संदर्भावर टीका करताना भाजपनं ‘मुस्लिम मतांसाठी भगवा दहशतवादासारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्यांकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकाचं प्रकाशन बुधवारी झालं. त्यावरुन आता देशात मोठा वाद सुरु झालाय. या पुस्तकात हिंदूत्वाबद्दल असं लिहिण्यात आलं आहे की, ‘ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे.’
खुर्शीद यांच्या ३०० पानांच्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माविषयी हा उल्लेख आला असल्याने आता हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक झालं आहेत. हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपनं खुर्शीदांविरोधात तक्रार केली आहे.
शिवसेनेनेही सलमान खुर्शीद यांना फटकारलं
सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्व काय आहे ते समजून घ्यावं. हिंदुत्ववादी संघटनांची कामं काय आहेत ज्याची तुलना थेट इसिसची करावी लागली. इसिसची तुलना करावी हे निंदनीय आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी जगभरात कुठेही बॉम्बस्फोट घडवले नाहीत. त्यामुळे खुर्शीद यांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत. त्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार
माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी नुकतंच आपलं पुस्तक ‘Sunrise over Ayodhya’ हे प्रकाशित केलं. यानंतर त्यांच्या पुस्तकातील काही भाग चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच निर्णयातील सकारात्मक गोष्टी पाहत आता देश या वादातून पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
जे व्हायचं ते होऊन गेलं. हा निकाल आपल्याला एक संधी देत आहे ती आपल्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कायमसाठी संपवून टाकावी. या निकालाचे तेच प्रयत्न आहेत, असं सलमान खुर्शीद म्हणाले. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाबाबत अनेक पैलूंवर आपले विचारही व्यक्त केले.
रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार आहे. जसं रामराज्य आहे तसंच जर तुम्ही इस्लामकडे पाहिलं तर त्यामुळे निजाम-ए-मुस्तफाबद्दल सांगण्यात आलं आहे, हे अगदी तसंच आहे. एकच विचार आहे, एकच मार्ग आहे. आपण केवळ शब्दांमध्ये अडकून राहू नये, यासाठी आम्ही खऱ्यापर्यंत पोहोचू शकू इतकं या पुस्तक कामी यावं, असंही खुर्शीद यांनी नमूद केलं.
६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही घडलं ते चुकीचं होतं. ही अशी घटना होती ज्यानं संविधानाला बदनाम केलं. दोन समुदायांमध्ये एक दरी निर्माण झाली. हे चुकीचं होतं. मी १०० वेळा सांगेन हे चुकीचं होतं. जवळपास ३०० जणांना मुक्त करण्यात आलं, जसं कोणी जेसिकाला मारलं नाही, तसंच बाबरी मशीद कोणी उद्ध्वस्त केली नाही, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुस्तकाच्या प्रकाशादरम्यान केलं.
आडवाणी यांनीच समाजात द्वेष पसरवला : दिग्विजय सिंग
लालकृष्ण आडवाणी यांच्या १९९० च्या रथयात्रेने समाजात फूट पाडली, असे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचे पुस्तक सनराइज ओव्हर अयोध्याः द नेशनहूड इन ऑवर टाइम्सच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारधारेवरही हल्ला चढवला आणि ती देशात द्वेष पसरवणारी असल्याचे म्हटले आहे.
दिग्विजय म्हणाले, १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.
दिग्विजय यांनी देशात द्वेष पसरण्यासाठी आडवाणी यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, १९८४ नंतर भाजप कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर चालू लागली, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा आधार आहे. आडवाणी यांच्या रथयात्रेने संपूर्ण देशात समाजात फूट पाडली. जेथे-जेथे आडवाणी गेले, तेथे-तेथे त्यांनी द्वेषाचे बीज पेरले.




