Top Newsराजकारण

सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: आर्यन खान प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सुनील पाटील नावाचा व्यक्ती या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे. सुनील पाटील यांचा संबंध राष्ट्रवादीशी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. सुनील पाटील तुमचा सदस्य आहे का? त्यावर तुमचं उत्तर काय? धुळ्याचे सुनील पाटील यांच्याशी राष्ट्रवादीचा थेट संबंध काय? आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी देत आहोत गुमानपणे कबुल करा. बऱ्याच गोष्टी आमच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे बाथरुमच्या आत शौचगृह असतं तिथूनही तोंड दाखवता येणार नाही. हा सुनील पाटील आर आर पाटील यांचं नाव बदनाम करत आहे. आज ते हयात नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. सुनील पाटील आबांचे नाव घेत आहेत. राष्ट्रवादीची आग मस्तकात जात नाही का? असा सवाल शेलार यांनी केला.

सुनील पाटील यांनी आर. आर. पाटील यांचं नाव घेतलं. आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव देखील घेतलं जातं आहे. त्यामुळे सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही तर मग सरकारचे हात काळे आहेत हे स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.

किरण गोसावी प्रकरण सीबीआयला देण्यात यावं. चिकू पठाण दाऊदचा हस्तक आहे. त्याच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख सह्याद्री अतिथीगृहात बैठका घेतात. ही गंभीर बाब आहे. राज्यातील प्रोटेक्शन मनी चिकू पठाण करत होता. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. शिवसेनेला हात जोडून विनंती आहे, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते काय करत आहेत ते पाहावं, असं शेलार म्हणाले.

कंबोज यांचे आरोप काय?

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील यांच्या नावाची माहिती दिली होती. गृहमंत्री ज्या व्यक्तीला भेटणार असतात त्या व्यक्तीची सर्व माहिती गृहमंत्र्यांना पोलीस विभागाकडून दिली जाते. तरीही देशमुख या चिंकू पठाणला भेटले. त्यामुळे त्यांचे आणि या ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज पेडलरांची पाठराखण करत आहेत का? सुनील पाटील यांचा या संपूर्ण प्रकरणाशी आणि राष्ट्रवादीचा काय संबंध आहे? याची उत्तरे राष्ट्रवादीने दिली पाहिजेत, अशी मागणी कंबोज यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असलेले पुरावे देणार असं म्हटलं होतं. मात्र तत्पूर्वीच भाजपाचे मोहित भारतीय यांनी दाऊदचा हस्तक राज्याच्या सह्याद्री गेस्ट हाऊसवर आल्याचा आरोप करत तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावले. मोहित भारतीय यांनी याबाबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्यात अनिल देशमुख यांच्यासोबत दाऊदचा हस्तक असल्याचा दावा केला.

मोहित भारतीय म्हणाले की, जानेवारी २०२१ मध्ये चिंकू पठाण हा म्याव म्याव ड्रग्सचा सर्वात मोठा डिलर असल्याचं म्हटलं जातं. याला अटक केली तेव्हा सगळीकडे बातम्या आल्या. चिंकू पठाण हा दाऊदचा हस्तक आहे. मात्र हाच टिंकू पठाण राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी कोविड काळात सह्याद्री अतिथीगृहावर गेला होता. मंत्री चिंकू पठाणसोबत काय करत होते? त्या भेटीवेळी सुनील पाटील, एका मंत्र्याचा जावईही उपस्थित होते. गृहमंत्र्यांना भेटणारी माणसं कोण होती? महाराष्ट्रात ड्रग्स मोहिमेला चालना देण्याचं काम राष्ट्रवादी नेते, मंत्री करत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आर्यन खानला छापेमारीवेळी पकडलं. तेव्हा जे फोटो आले ते किरण गोसावीने सुनील पाटीलला पाठवले. त्यानंतर सुनील पाटीलने हे फोटो मंत्र्यांना पाठवले. जे केंद्रावर प्रश्न विचारतात. ते मंत्रिपदाचा गैरवापर करून षडयंत्र रचून राज्याला बदनाम करत आहेत. या प्रकरणाची एनआयए चौकशी व्हावी. ड्रग्सच्या माध्यमातून आलेला पैसा देशाविरोधी वापरला जातोय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

धुळ्याचे सुनील पाटील कोण आहेत?

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचे मास्टरमाईंड सुनील पाटील असून त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेसशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंभोज यांनी केला आहे. सुनील पाटील हे धुळे शहरापासून अवघे दहा कि.मी. अंतरावर असलेल्या गावचे रहिवाशी आहेत. सुनील पाटील यांचं नाव सुनील चौधरी पाटील असं आहे. त्यांच्या गावी त्यांना सुनील चौधरी म्हणून ओळखतात. मात्र ते त्यांच्या पुर्वजांना मिळालेल्या ‘पाटीलकी’मुळे पाटील आडनाव लावतात. आजही धुळ्यातील टेकडी परिसिरात त्याचे आई-वडिल व अन्य सदस्य राहतात. याठिकाणी त्यांचा बंगलाही आहे.

तथापि, सुनील पाटील यांचे संबंध हे अनेक राजकीय नेत्यांशी देखील आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे ते निकटवर्तीय होते असं बोललं जात आहे. तसंच, राज्याचे माजी गृहमंत्री जे आता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांच्याशी देखील संबंध असल्याचे समजते. आर. आर. पाटील यांच्यासोबत जे अधिकारी होते, तेच अधिकारी अनिल देशमुख यांच्यासोबत होते. या अधिकाऱ्यांसोबत सुनील पाटील यांचे चांगले संबंध आहेत. तसंच अनिल देशमुख यांच्या ईडी प्रकरणात सुनील पाटील नाव आलं होतं. ते सुनील पाटील हेच असल्याचं बोललं जात आहे. याच्या मदतीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि भाचा सत्यजीत देशमुख या दोघांच्या मदतीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती, असं ईडीच्या चौकशीत समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान केसमध्ये सॅम डिसुझाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर गेले काही दिवस बेपत्ता असलेला सॅम डिसुझाने एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली. यात त्याने सुनील पाटील यांचं नाव घेतलं. दरम्यान, शनिवारी मोहित भारतीय यांनी सुनील पाटील यांचे संबंध राष्ट्रवादीशी असल्याचा आरोप करत ते धुळ्याचे असल्याचं सांगितलं.

दरम्यान, मोहित भारतीय यांच्या आरोपानंतर सुनील पाटील यांचे भाजपच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल होत आहेत. याशिवाय, फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला आणि क्रूझ ड्रग्ज प्रकरण एनसीबीचा पंच असलेला किरण गोसावी तसंच मनीष भानुशाली याच्यासोबतचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button