बोअरवेल व्यावसायिकांचा संप मागे

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या इंधन दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांपासून सर्वच स्तरांतील व्यवसायिकांना देखील बसला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे व्यवसायिकांना आपला व्यवसाय करणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा बोअरवेल असोसिएशन ने जिल्ह्यात तीन दिवसांपासून संप पुकारला होता. या संपाच्या अनुषंगाने असोसिएशनच्यावतीने दिनांक ३० ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत इंधन दरवाढीच्या विरोधा सोबतच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार बोरवेल असोसिएशनच्या वतीने नवे दरपत्रक जाहीर करण्यात आले. नव्या दर पत्रकानुसार बोरवेल खोदण्याचा दर प्रति फूट ११० रुपये तर, क्रेसिंग पाईपचा प्रतिफूट दर ३०० रुपये असा असेल. असोसिएशनने जाहीर केलेल्या दर पत्रकाला सर्व व्यावसायिकांनी एकमताने मंजुरी दिली. शिवाय दरपत्रकापेक्षा कमी दराने बोरवेलचे काम करणाऱ्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांच्या दंडासोबतच पंधरा दिवसांपर्यंत बोरवेलची मशिनरी जप्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इंधनदरवाढी सोबतच इतर उपयोगी साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत.या व्यवसायावर अनेक घटक विसंबून आहे. त्यामुळे नव्या दर पत्रकाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या. तसेच आजपासून संप मागे घेतल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. या बैठकीसाठी नाशिक जिल्हा बोअरवेल असोसिएशन तर्फे उज्ज्वल बोअरवेल्स चे संचालक कौशिक कदम, संजय धोंडगे, संजय थोरात, राजू मांदळे ,जयंत धारणकर, लक्ष्मण मेनन व सर्व पदाधिकारी , व्यवसायिक उपस्थित होते..




