हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडणार?

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुश्रीफ केवळ दोन वर्षांसाठीच पालकमंत्री पद घेणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं. त्यामुळे पालकमंत्री पद सोडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद सोडत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत २७०० पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि. ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी २ कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.




