
नागपूर : सिंधुदुर्गात झालेल्या चिपी विमानतळ उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबरला नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलं. तसेच, कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणाले. यावर आता विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सारवासारव केली आहे.
नागपूरमध्ये मीडियाशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंचा चीपी विमानतळाच्या निर्माण कार्यात मोठा वाटा आहे. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं, त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता याच विमानतळावरुन विमान उडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, हे विमानतळ कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी नारायण राणे आणि आमचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं समन्वयानंच काम करायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादाची काही लढाई नाही. राणेंचं जे काही योगदान आहे ते कुणीही नाकारु शकत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.
बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, मराठी माणसाचा नाही
बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा पारा चढलेला दिसला. मराठी माणूस पराभूत झाला म्हणून पेढे कसले वाटता? लाज वाटत नाही का, असा हल्लाबोल अप्रत्यक्षरित्या भाजपवर केला होता. यावरून भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून, बेळगावात संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला. मराठी माणसाचा नाही, अशी बोचरी टीका केली आहे.
बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.




