
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली. यानंतर शिवसेनेकडूनही नारायण राणे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले असून, केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा पलटवार करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. यावर शिवसेनेने जशास तसा पलटवार केला आहे.
आम्हा मावळ्यांमध्ये हात छाटण्याची ताकद : विनायक राऊत
स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. पण एक लक्षात ठेवावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर कोणतेही नेते असतील, त्यांच्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटायची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला
राणे यांचा आता फुगा फाटला
नारायण राणे यांचा आता फुगा फुटलेला आहे. ते ऑक्सिजनवर आहेत. सामान्य शिवसैनिकांनीच त्यांचा फुगा फोडलेला आहे. आता दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करण्यापलिकडे त्यांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना आता एकच जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेवर टीका करा, हेच त्यांचे ऑक्सिजन आहे. हे त्यांनी केले नाही तर त्यांचे मंत्रिपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावच लागणार. त्यामुळे नारायण राणे काय करत आहेत याची आम्हाला अजिबात चिंता नाही, या शब्दांत मनिषा कायंदे यांनी टीकास्त्र सोडले आहे.




