सेक्स व्हीडिओमुळे गुजरातमधील भाजपचा बडा नेता अडचणीत

अहमदाबाद : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका सेक्स व्हीडिओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हीडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने १५ ऑगस्टला संपूर्ण व्हीडिओ समोर आणणार असल्याचा दावा केला आहे. मात्र तत्पूर्वीच हा व्हीडिओ शेअर होऊ लागला आहे. दरम्यान, या व्हीडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भाजपाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहे. मात्र परबत पटेल यांनी हे कटकारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्या मुलाने पोलिसांमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
या व्हीडिओबाबत बनासकांठा येथील आम आदमी पक्षाचे नेते मधाभाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कुणाचाही फोटो दिसत नव्हता. मात्र मधाभाई यांनी ते भाजपाच्या या नेत्याचा संपूर्ण व्हीडिओ १५ ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुकवर शेअर करणार असल्याचा दावा केला होता.
मात्र ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर भाजपाचे नेते आणि खासदार परबत पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये कधीही कुठलेही वाईट काम केलेले नाही. कदाचित माझे फोटो एडिट करून मॉर्फ करण्यात आले असावेत अशी शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर या प्रकरणी परबत पटेल यांच्या मुलाने मधाभाई पटेल आणि मुकेश राजपूत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. माझे वडील निर्दोष आहेत. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे म्हटले आहे.




