राजकारण

मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या !

एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारला आवाहन

पुणे: कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर या भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी मदतकार्याचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी असून, केंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्या, असे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

कोकणात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कँम्प राबवले जातायत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केले जाईल. पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास २५० पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button