देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ; केरळमध्ये ‘झिका’चे आणखी ५ रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहे. मंगळवारी चार महिन्यांनंतर सर्वात कमी ३१,४४३ नवे रुग्ण आढळले होते. मात्र, यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या रुग्णवाढीला तिसऱ्या लाटेशी जोडून पाहिले जात आहे. दरम्यान, दुसरीकडे केरळमध्ये पुन्हा झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये आणखी पाच लोकांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. या पाच नवीन रुग्णांपैकी अनायरामधील दोन, कुन्नुकुझी, पत्तम आणि पूर्व किल्ल्यातील प्रत्येकी एक रुग्ण झिका व्हायरसने संक्रमित झाले आहेत. तसेच, राज्यात एकूण २८ जणांना झिका व्हायसरची लागण झाली आहे, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
देशात गुरुवारी गेल्या २४ तासांत ४१,८५४ नवे कोरोना बाधित आढळले, तर ५८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी देशात ३८,७९२ नवे कोरोनना बाधित रुग्ण समोर आले होते, तर ६२४ जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता.
मागील एक महिना ७ ते ८ हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत. राज्यातील ९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांत आहेत. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, नगर, रायगड येथील रुग्णसंख्या वाढत आहे.
जगात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ
जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी कोरोना परिस्थितीसंदर्भातील साप्ताहिक अहवाल जारी केला. यात ५ ते ११ जुलै या कालावधीत जगभरात ३० लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही ११ टक्के रुग्णवाढ ठरली आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या आठवड्यात ५५ हजाराहून अधिक जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. मृत्यूंच्या संख्येत ३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
केरळमध्ये झिका व्हायरसचे आणखी ५ रुग्ण
केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, झिका व्हायरसच्या संसर्गाचा एक क्लस्टर तिरुअनंतपुरमच्या अनयारा परिसरातील तीन किलोमीटरच्या परिसतात आढळला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावित भागात डासांची फॉगिंग अधिक तीव्र केली जाईल.
आरोग्यमंत्री म्हणाल्या की, आम्ही एक सूक्ष्म योजना तयार केली आहे. रेक्टरने नियंत्रण कार्य अधिक तीव्र करण्याचा आणि फॉगिंग तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने या उपक्रम अधिक तीव्र केले आहेत आणि जिल्हा प्रशासनही त्यातील एक भाग असेल आणि सर्व विभागांचे समन्वय साधेल. पुढील ७ दिवस ते फॉगिंग करणार आहेत. तसेच, डीएमओ कार्यालयातून कंट्रोल रूम सुरु करण्यात आले आहे, जे चोवीस तास काम करेल. झिका व्हायरसबद्दल माहिती किंवा शंका असलेले लोक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संकट काळात आणखी एका झिका व्हायरसने चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे केरळमध्ये हायअलर्टची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे यापूर्वीच राज्यांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ केरळ सरकारला अडचणीची ठरू शकते. मात्र, झिका व्हायरस कोरोना इतका प्राणघातक नाही, ही एक दिलासादायक बाब आहे.
झिका व्हायरसची लक्षणे
झिका व्हायरस हा डास चावल्यानंतर पसरणारा आजार आहे. याची लक्षणे चिकन गुनियासारखीच आहेत. हा व्हायरस एडीस डास चावल्यानंतर पसरतो. गर्भधारणेदरम्यान महिलांना जास्त संक्रमण होऊ शकते. ताप आणि शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, स्नायू आणि डोकेदुखीचा त्रास, या आजारामुळे होते.




