विम्बल्डन टेनिस स्पर्धा : रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव

लंडन : ‘हिरवळीवरील बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला बुधवारी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने फेडररचे साम्राज्य संपुष्टात आणून कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह यांनीही अंतिम चार खेळाडूंतील स्थान पक्के केले.
सर्वाधिक आठ वेळा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीचे जेतेपद मिळवणाऱ्या फेडररला २४ वर्षीय हुर्काझ आदर्श मानतो. मात्र बुधवारी उपांत्यपूर्व सामन्यात १४व्या मानांकित हुर्काझने फेडररवर अवघ्या १ तास आणि ४९ मिनिटांत ६-३, ७-६ (७-४), ६-० असे सरळ तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे फेडररचे २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले आणि सेंटर कोर्टवर उपस्थित सर्व चाहत्यांना विम्बल्डनमधील जणू अखेरचा सामना खेळल्याचे संकेत देत फेडरर टाळ्यांच्या कडकडाटात बाहेर पडला. उपांत्य फेरीत हुर्काझची मॅटेओ बेरेट्टिनी-फेलिक्स ऑगर यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.
अन्य लढतींमध्ये अग्रमानांकित जोकोव्हिचने ग्रँडस्लॅम स्पर्धामधील उपांत्यपूर्व फेरीचा सुवर्णमहोत्सव शानदार विजयानिशी साजरा करताना हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सचा ६-३, ६-४, ६-४ असा पराभव केला. जोकोव्हिचने १०व्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. १०व्या मानांकित शापोवालोव्हने २५व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हवर ६-४, ३-६, ५-७, ६-१, ६-३ अशी तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मात केली. उपांत्य फेरीत जोकोव्हिच-शापोवालोव्ह आमनेसामने येतील.
सानिया-बोपण्णाचा पराभव
मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व पेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना आंद्रेजा क्लिपॅच-जीन रॉजर यांनी ३-६, ६-३, ९-११ असे तीन सेटमध्ये नमवले.




