भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आणखी एक जबाबदारी
महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. भाजपात आल्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. मागील अनेक महिन्यांपासून चित्रा वाघ सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधात आक्रमक पवित्रा घेत प्रसंगी रस्त्यावरही उतरल्याचं दिसून आलं. पक्षाने चित्रा वाघ यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
चित्रा वाघ यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात चंद्रकांत पाटील म्हणतात की, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून आपण जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात. गेल्या अनेक वर्षे आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात. युवती आणि महिला या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आगामी काळात भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी चित्रा वाघ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल व त्यांचा संघटनेला निश्चित लाभ होईल असा विश्वास आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चित्रा वाघ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




