ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यास ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंत मुदत

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
‘आयसीसी’च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हेसुद्धा उपस्थित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोनाजन्य स्थिती पाहता हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
‘विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘आयसीसी’ने ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. पुढील बैठकीत ‘बीसीसीआय’ परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन सर्वाच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेईल, असे अपेक्षित आहे,’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
विश्वचषकापूर्वी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित साामने अमिरातीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विश्वचषक तेथेच खेळवणे सोयीचे ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. तसेच ओमान येथे किमान साखळी सामने खेळवण्याच्या पर्यायाचाही ‘आयसीसी’ विचार करत आहे. ‘ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे, तर जूनमध्ये ‘आयपीएल’संपल्यावर भारतात पावसामुळे काही सामन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असेही ‘आयसीसी’चा पदाधिकारी म्हणाला.
एकदिवसीय विश्वचषकात १४ संघांचा समावेश
२०२७ आणि २०३१च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धामध्ये १० ऐवजी १४ संघांचा समावेश करण्यात येईल, असे ‘आयसीसी’ने जाहीर केले. यामध्ये एका गटात प्रत्येकी सात संघांचा समावेश असेल. गटातील अव्वल तीन संघ ‘सुपर-सिक्स’ या फेरीत पोहोचतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होईल. यापूर्वी २००३च्या विश्वचषकात अशा स्वरुपात सामने खेळवण्यात आले होते. त्याशिवाय २०२४पासून दर दोन वर्षांनी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. २०२१मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेऐवजी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला प्राधान्य देण्यात आले. परंतु २०२५ आणि २०२९मध्ये चॅम्पियन्स करंडक पुन्हा रंगणार आहे.




