अर्थ-उद्योग

राम मंदिरासाठी दीड महिन्यात अडीच हजार कोटी रुपये जमा

आता घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणे बंद; फक्त ऑनलाईन पद्धतीने गोळा करणार

नवी दिल्ली: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून वर्गणी जमा केली जात होती. आतापर्यंत जमा झालेली वर्गणी ही तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्यावर गेली असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात येत असून यापूढे ऑनलाईन पद्धतीने वर्गणी गोळा केली जाईल असंही श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या काळात देशातील 40 हजार खेडी आणि शहरे तसेत 10 कोटी कुटुंबापर्यंत पोहचल्याचा दावा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामध्ये 1.75 लाख टीम आणि नऊ लाख कार्यकर्त्यांचा सहभाग होता. वर्गणी गोळा करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी देशभरात 49 कंट्रोल रुम्स निर्माण करण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून देशभर समन्वय साधला गेला.

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतभरातून जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात एएनआयशी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले, “राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या 3 वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button