
मुंबई : मुंबईत कोरोनावरील रशियन लस स्पुतनिकसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार असल्याची माहिती, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील लसीकरणासह विविध विषयावर भाष्य केलं.
मुंबईत स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष कोल्ड स्टोरेजच्या जागेची चाचपणी सुरु केली आहे. कांजुरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे मुंबई महापालिकेचे प्रयत्न आहेत. मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांसाठी सोयीस्कर जाईल अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार, असं पेडणेकर म्हणाल्या.
स्पुतनिकसाठी मुंबई अद्याप रेड्डीज लॅबवर अवलंबून आहे. स्पुतनिकच्या कोल्ड स्टोरेजचा प्रश्न आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. भारतात लसीच्या ५ कंपन्या आहेत, पण रेड्डीज अशी एकमेव कंपनी आहे, ज्याला परवानगीदेखील आहे, ते पुरवठादेखील करु शकतात. रेड्डीज लॅबोरेटरी आहे त्यांचं म्हणणं आहे आमचं कोल्डस्टोरेज आहे त्यांना देणार आहोत. खेड्यापाड्यात हे स्टोरेज देता येतील असं सांगितले आहे. आपल्याला घेता येईल याबाबत आपण बघतो आहोत. कंजूरमार्गचं कोल्डस्टोरेज आहे तिथे कोव्हिशिल्ड लसीचा साठा केला जातो. पण रेड्डीजने लस दिली तर आपण पाहणी करत आहोत, ईस्टर्न आणि वेस्टर्नला लस साठवता येईल का यावर चर्चा केली जाईल, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.




