
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्य सरकारची पुन्हा कोंडी केली असून विधानसभा अध्यक्षपदासाठी केव्हा निवडणूक घेणार, अशी विचारणा त्यांनी केली आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. याबद्दल राज्यपालांनी थेट सरकारला पत्र लिहिले आहे.
राज्यपालांच्या पत्राला सरकार लवकरच प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालांचे पत्र म्हणजे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. पटोले यांची काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिला आहे. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एक मार्चपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड करायची की नाही याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधीच एक दिवसाचे तातडीचे अधिवेशन बोलवावे, असाही प्रस्ताव आहे.
राज्यपालांना उत्तराखंड येथे जाण्यासाठी सरकारने विमान नाकारल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. तेव्हाच सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचा मुद्दा टोकाला गेला होता. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमावयाच्या नावांना राज्यपाल मान्यता देत नसल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. हा संघर्ष आता पुन्हा समोर आला आहे.