राजकारण

राम मंदिरासाठी देणगी देण्यास सिद्धारामैय्या यांचा नकार

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये गेले काही दिवस राम मंदिराच्या देणगीवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर केलेल्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी राम मंदिरासाठी देणगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी जमा होत असलेल्या देणगीवरून राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. राम मंदिरासाठी देणगी मागायला आले, तर त्यांना सांगेन की, अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरासाठी काही झाले तरी देणगी देणार नाही. त्यामुळे दुसरीकडे बांधल्या जात असलेल्या राम मंदिरासाठी देणगी देईन, असे सिद्धारामैय्या यांनी स्पष्ट केले. अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर प्रकरणी तोडगा निघाला असला, तरी वाद कायम राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सिद्धारामैय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत कर्नाटक आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहिती सिद्धारामैय्या यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केलेल्या राम मंदिरासाठी जमा केल्या जात असलेल्या देणगीबाबत केलेल्या ट्विटवरून विश्व हिंदू परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे. कुमारस्वामी यांनी बेजबाबदारपणे ट्विट केले आहे. श्रीराम ही भारताची ओळख आहे, हे सर्वश्रुत आहे. विश्व हिंदू परिषद आणि संलग्न संघटना राम मंदिरासाठी देणग्या गोळा करत आहे. बहुतांश जण आपापल्यापरिने योगदान देत आहेत. अशावेळी कुमारस्वामी यांनी केलेले ट्विट योग्य नाही, असे विश्व हिंदू परिषदेकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button