भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत!
खासदार सुब्रमण्यम स्वामी, काँग्रेसने भाजपला घेरले
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. सोशल मीडियावर लोकांचा रागही दिसू लागला आहे. आता विरोधकांसह सत्ताधारी भाजपाचे नेते देखील मोदी सरकारला जाब विचारला आहे. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी शुक्रवारी ट्विट करून सांगितले की, जनतेच्या मते वाढत्या किंमती या त्याचे शोषण करणारी आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलवरून लेव्ही हटवायला हवा.
स्वामी यांनी ट्विट करून सांगितले की, लोकांचा आवाज कधीतरी स्पष्ट आणि मोठा होतो. कधी कधी असे होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून एकसारखा मतप्रवाह आहे. (पॉर्न व्हेंडर, आयफोन चोर आणि फेक आयडीवाले ट्विटर युजर सोडून) इंधनाच्या वाढत्या किंमती शोषण करणाऱ्या आहेत. यामुळे सरकारने कर हटवायला हवेत.
दुसरीकडे महिला काँग्रेसने छत्तीसगढचा हवाला देत केवळ काँग्रेसच सामान्य लोकांची काळजी घेऊ शकते. वाढत्या किंमती या देशात आहेत. परंतू काँग्रेसच्या राज्यात त्यापेक्षा 12 रुपयांनी पेट्रोल आणि 4 रुपय़ांनी डिझेल स्वस्त आहे, असे ट्विट केले आहे.
युवक काँग्रेसचे नेते श्रीवत्स यांनी भारताचा शेजारी देश भूतानचे उदाहरण दिले आहे. भूतानमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती या भारतापेक्षा निम्म्या आहेत. त्यांना सर्व प्रकारचे इंधन हे भारतातून पुरविले जाते. तिथे पेट्रोलचा दर 50 रुपये आहे, आणि भारतात तोच दर 100 रुपये आहे. भूतानी नागरिक देशविरोधी आहेत का? जे भारतीयांसारखे देशाच्या विकासासाठी भलामोठा कर देऊ इच्छित नाहीत. ही अच्छे दिनची जादू आणि सुंदरता आहे, असा टोला हाणला आहे.