पंतप्रधानांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ यंदा होणार ऑनलाइन
नवी दिल्ली : ‘परीक्षा पे चर्चा’चं हे यंदा चौथं वर्ष आहे. मार्च २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘मला ही माहिती देताना खूप आनंद होतोय की सर्व विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहात होते ती ‘परीक्षा पे चर्चा’ लवकरच घडून येणार आहे. तेव्हा ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहभागी व्हा आणि हसतखेळत आपल्या परीक्षेचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज व्हा’
कोविड -१९ महामारीमुळे यावर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ ऑनलाइन होणार आहे. चर्चेसाठी नोंदणी १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि १४ मार्चपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. चर्चेत प्रश्न विचारण्यासाठी स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा १६ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ केली होती.