संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही; भाजप आक्रमक
भाजपचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात, संजय राठोड हे दोषी आहेत, अशा थेट आरोप भाजपने केला आहे. त्यामुळेच संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
आपला सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्याचा निलाजरा प्रयत्न सुरु आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर एव्हढंच लॉजिक आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या राजीनाम्याची वाट बघण्याची गरज नाही. ते कधीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करु शकतात. मात्र सुसंस्कृतपणाचा बुरखा कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. पण जोपर्यंत संजय राठोड राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत भाजप अधिवेशन चालू देणार नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. पूजा चव्हाण यांची आत्महत्या किंवा हत्या झाली आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तावेज उपलब्ध आहे,साक्षीदार आहे. चौकशी होत नाही म्हणून सरकारवर दबाव भाजपा आणत आहे. महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता एक राज्यशासक म्हणून ठाकरे बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आक्रमक आहे. पूजा चव्हाण मृत्यूचा छडा लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. संशयाची सुई संजय राठोड यांच्यावर आहे त्यामुळे राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व झाल्यास मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पोलिसांचा तपास नेमक्या कोणत्या दिशेने सुरु आहे हे गृहमंत्र्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.