
मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ एप्रिलला होऊ घातलेली राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केली. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.
एमपीएससीची परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत रविवारी होणारी एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच विकेंड लॉकडाऊनमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी जाणवत होत्या. त्य़ामुळे अनेक एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी होणार परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्य़मंत्र्य़ांकडे केली होती.
दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. दरम्यान मंत्रिमंडळातील नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांसह काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी योग्य नियोजन करत परीक्षा घ्याव्यात आणि आत्ता घोषित केलेल्या परीक्षांच्या तारखेबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली होती.
या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनसह सर्व नेत्यांनी याला योग्य प्रतिसाद देत परीक्षा रद्द केली आहे.