
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं इंडिया गेटवर असलेली अमर जवान ज्योत आता राष्ट्र्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन केली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात असतानाच आज मोदींनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याची घोषणा केली आहे.
संपूर्ण देश सध्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की नेताजींची संपूर्ण ग्रेनाईटनं तयार करण्यात येणारी भव्य प्रतिमा इंडिया गेट येथे उभारली जाईल. त्यांनी केलेल्या कार्याप्रती हा एक सन्मान ठरेल, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सोबतच इंडिया गेटवर ज्या चबुतऱ्यावर नेताजींचा प्रस्तावित पुतळा उभारला जाणार आहे त्याचा एक फोटो देखील ट्विट केला आहे.
Till the grand statue of Netaji Bose is completed, a hologram statue of his would be present at the same place. I will unveil the hologram statue on 23rd January, Netaji’s birth anniversary. pic.twitter.com/jsxFJwEkSJ
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022
इंडिया गेट आणि राष्ट्रीय स्मारकच्यामध्ये एक रिकामी चबुतरा आहे. याच ठिकाणी नेताजींचा पुतळा उभारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा चबुतरा रिकामी आहे. याआधी या चबुतऱ्यावर जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. १९६८ साली तो चबुतऱ्यावरुन हटवण्यात आला आणि तो कोरोनेशन पार्कमध्ये पाठविण्यात आला होता. तेव्हापासून हा चबुतरा रिकामीच आहे.
इंडिया गेटवर ५० वर्षे अखंड प्रज्वलित असलेली ‘अमर जवान ज्योत’ विझणार
गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून इंडिया गेटवर प्रज्वलित असलेली ‘अमर जवान ज्योती’ आजपासून विझविली जाणार आहे. ही ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकवर प्रज्वलित केली जाणार आहे. आज दुपारी ही ज्योत नॅशनल वॉर मेमोरिअल येथे नेली जाणार आहे.
दोन्ही स्मारकांमधील अंतर हे अर्धा किमी आहे. २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण केले होते. येथे २५,९४२ सैनिकांची नावे सुवर्णाक्षरात कोरण्यात आली आहेत. अमर जवान ज्योती इंडिया गेटच्या खाली आहे. १९२१ मध्ये इंग्रजांनी इंडिया गेट बांधले होते. पहिल्या विश्व युद्धात ८४,००० सैनिकांच्या आठवणीत हे स्मारक बांधण्यात आले होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश वेगळा करण्यात आला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या युद्धातील ३,८४३ शहीद जवानांची आठवण म्हणून इंडिया गेटखाली अमर ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्धाटन केले होते.
१९७१ च्या युद्धाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अमर जवान ज्योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये हलविली जाणार आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उभारणीपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, लष्करप्रमुख आणि पाहुणे प्रतिनिधी अमर जवान ज्योती येथेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत होते. परंतु, नंतर ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे वळवण्यात आली. असे असूनही इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे मोठी गर्दी जमायची. सध्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामामुळे हा परिसर बंद आहे. अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अमर चक्रातही आहे. इंडिया गेटवर जळणारी ज्योत यात विलीन करावी लागेल.
भाजपला त्याग, शौर्य व बलिदानाचे महत्व कसे कळणार ? : पटोले

देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारी ५० वर्षांची शौर्यगाथा पुसून टाकण्याचे पातक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. वीर जवानांच्या शौर्याची साक्ष देणारी दिल्लीतील ‘अमर जवान ज्योत’ कायमची विझवण्याचा अश्लाघ्य प्रकार करुन मोदी सरकारने देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला असून हा अपमान देश कदापी सहन करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पटोले म्हणाले की, या देशाला त्याग, शौर्य व बलिदानाचा मोठा इतिहास आहे. हजारो वीर जनावांच्या अतुलनीय शौर्याची प्रेरणा करोडो जनतेच्या मनात तेवत रहावी, त्यातून स्फूर्ती मिळावी यासाठी अमर जवान ज्योती सारखी स्मारके उभे केली जातात पण केंद्रात सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचाराच्या सरकारला या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? त्यांना तर असा कोणताही गौरवशाली इतिहास नाही परंतु जो गौरवशाली इतिहास आहे तो पुसण्याचा कृतघ्नपणा भाजपा सरकार करत आहे. ‘अमर जवान ज्योत’ विझवण्यासाठी देण्यात आलेले कारणसुद्धा अत्यंत तकलादू व बालिशपणाचे आहे.
देशाचे कणखर नेतृत्व, दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी १९७१ साली पाकिस्तानला धडा शिकवत दोन तुकडे केले व जगाच्या नकाशावर बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी ही ‘अमर जवान ज्योत’ विझवून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान पुसण्याचे पातक संघ विचाराचे सरकार करत आहे. परंतु त्यांच्या अशा कृतीने त्यांचे योगदान पुसले जाऊ शकत नाही आणि वीर जवानांनी देशासाठी दिलेले बलिदानही विसरले जाऊ शकत नाही.
बांग्लादेश मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही एवढा कोतेपणा त्यांनी दर्शवला होता. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना त्यात स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर देशासाठी अमुल्य योगदान दिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचाही उल्लेख केंद्रातील भाजपा सरकारने टाळला. आरएसएस व भारतीय जनता पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व देशाच्या जडणघडणीत काडीचेही योगदान नाही. ते नेहरू गांधी यांचे योगदान नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपा सरकारने आज ‘अमर जवान ज्योत’ विझवली तरी देशवासियांच्या मनात ती कायम तेवत राहील, असेही पटोले यांनी सांगितले.




