मुक्तपीठराजकारण

पप्पांचा शेवटचा दिवस ! आर. आर. आबांच्या लेकीची भावूक पोस्ट

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाची आठवण आजही काढली जाते. आबांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे दाखले आजही दिले जातात. फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले होते. दरम्यान, २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक स्मिता पाटील यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पप्पांचा शेवटचा दिवस! असे शिर्षक देऊन स्मिता पाटील यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणतात की, आज ८ नोव्हेंबर. बरोबर ७ वर्षे झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय, असे पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.

३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. त्यानंतर ६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव त्यांनी दोन-दोनदा फिरून पाहिले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे पाहून जात असत. पण त्यादिवशी मात्र पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया हिला भेटण्यासाठी आमच्या रूममध्ये आले. पप्पांनी त्यादिवशी वर येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही दोघी बहिणीही विचार करू लागलो की, पप्पांना काय वाटले असावे, की पप्पांनी मिठ्ठी मारली आणि पप्पांच्या डोळ्यात का पाणी आले असावे? पण आम्हाला वाटलेही नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवट चे कुशीत घेतले आहे, अशी आठवण स्मिता पाटील यांनी जागवली.

त्यांनी पुढे लिहिले की, त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारुती-शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार? कदाचित मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? असा भावूक प्रश्न स्मिता पाटील यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button